सांगलीतील एका तरुणाने इंस्टाग्रामवर ‘पावती फाडायची नाय’ असा रिल्स करून पोलिसांना आव्हान दिले. सांगली पोलिसांच्या सोशल मॉनिटरिंग सेलने त्याला शोधून पकडले आणि २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणातून पोलिसांनी ‘कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल’ असा इशारा दिला.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
सांगली: सांगली शहरात सोशल मीडियावरचा ‘रिल्स’चा धुमाकूळ आता नुसता मनोरंजनापुरता राहिलेला नाही. काही जण ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या मोहात कायदा मोडण्याइतपत पुढे गेले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘सांगलीचा एक तरुण’ त्याने ‘पावती फाडायची नाय…’ म्हणत केलेला धाडसी रिल्स व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याला दाखवून दिले की कायदा सर्वांपेक्षा मोठा असतो.
‘इंस्टाग्राम’वर लोकप्रिय होण्याच्या नादात या तरुणाने बेदरकारपणे बाईक चालवत ‘रिल्स’ तयार केला. त्यात तो थेट पोलिसांना ‘पावती करायची नाय’ असे जाहीर आव्हान देताना दिसत होता. काही तासांतच हा व्हिडिओ सांगली आणि परिसरात व्हायरल झाला. ‘लाईक्स’चा पाऊस पडू लागला, पण त्या बरोबरच पोलिसांची नजरही त्याच्यावर गेली.
सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांना त्या ‘रिल्स स्टार’चा शोध घेण्याचे आदेश दिले. सायबर सेलने तात्काळ कारवाई करत त्याचा इंस्टाग्राम आयडी, लोकेशन आणि मोबाईल क्रमांक शोधून काढला. ही माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने या तरुणाला पकडले आणि शाखेत आणले. सुरुवातीला तो मोठ्या आत्मविश्वासाने आला होता, पण पोलिसदादांच्या चौकशीत त्याचा आत्मविश्वास पत्त्याचा बंगला ठरला. काही वेळातच तो गयावया करू लागला. “दादा माफी मागतो, माझे चुकले, माझी पावती फाडा” अशी त्याची आर्जवे सुरू झाली.
पोलिसांनी मात्र त्याची ही ‘रिल्सस्टार’ शैलीतच परतफेड केली. त्याच्याकडून ‘मी चुकलो, कोणीही अशी स्टंटबाजी करू नका’ असा व्हिडिओ बनवण्यात आला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तरुणाचे तेच फॉलोअर्स आता त्याच्या पश्चात्तापावर ‘लाईक्स’ टाकत आहेत.
या कारवाईत पोलिसांनी संबंधित तरुणावर २२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि तो त्वरित वसूलही केला. “कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल” हा संदेश पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणातून समाजाला दिला.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सां-गली पोलिसांनी सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘सोशल मॉनिटरिंग सेल’ कार्यान्वित केला आहे. या सेलच्या दक्षतेमुळे कायदा मोडणारे, उचकवणारे किंवा वाद निर्माण करणारे व्हिडिओ तयार करणारे नेटकरी सहज सापडतात.
अलीकडेच मिरजेत दोन गटांतील वादानंतर काहींनी सोशल मीडियावर भडकावणारे पोस्ट्स टाकून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करून नोटिसा बजावल्या आणि कठोर इशारा दिला की पुढील वेळेस अशी चूक झाल्यास थेट पोलिस कोठडीत रवानगी होईल.
‘पावती फाडायची नाय’ म्हणणारा सांगलीचा तरुण आता स्वतःच सांगतो आहे – ‘बाबांनो, अशी स्टंटबाजी करू नका!’
सोशल मीडियावरची प्रसिद्धी काही क्षणांची असते, पण कायद्याचा हात कायम लक्षात राहतो. सां-गली पोलिसांच्या या कारवाईतून तरुणाईला स्पष्ट संदेश गेला आहे – “रिल्स करा, पण नियम नको तोडा.”
