🔥 मिरज तालुक्यातील खटाव येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 3 ते 4 एकर ऊस व अर्धा एकर मका पीक जळून खाक. गावकऱ्यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. शेतकऱ्यांची शासकीय मदतीची मागणी.🔥
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, मिरज)
मिरज तालुक्यातील खटाव (ता. मिरज) येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बाळूमाने यांच्या शेतात भीषण आग लागली. या आगीत तब्बल तीन ते चार एकर ऊस पीक पूर्णपणे जळून खाक झाले, तर अर्धा एकर मका पीक देखील राख झाले आहे.
ही घटना कर्नाटक सीमेजवळील विष्णुवाडी रोडलगत असलेल्या शेतात घडली. शेतातून विद्युत तारा जात असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या आणि काही क्षणांतच ऊसाच्या शेताला आग लागली. उन्हाळ्यातील कोरडी हवा आणि उसातील सुक्या पानांमुळे आगीचा भडका उडाला आणि ती झपाट्याने पसरली.

आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाणी फेकून, फांद्या वापरून आणि मोटार पंपांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे सुमारे एक एकर ऊस व एक एकर मका पीक वाचवण्यात यश आले.
या आगीत दर्याप्पा पुंडलिक बाळूमाने, परशुराम पुंडलिक बाळूमाने, आप्पासो बाळूमाने आणि दर्याप्पा महादेव बाळूमाने या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिके जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांनी त्वरीत पंचनामे करून शासकीय मदतीची मागणी केली आहे.
तसेच आगीत नुकसान झालेल्या ऊस पिकाची तातडीने तोड करून साखर कारखान्यांना पाठवण्याबाबत प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे काही क्षणांत भस्मसात होणे ही वेदनादायक बाब असून, विज वितरण विभागाने ग्रामीण भागातील विद्युत तारा आणि जोडणीचे नियमित देखभाल कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
