sangli news: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

sangli news: सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मवर्षानिमित्त राज्यातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

In Sangli, on the occasion of the 300th birth anniversary of Punyashlok Ahilyadevi Holkar, the tallest equestrian statue in the state was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis.

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
शौर्य, धर्मप्रियता, उत्कृष्ट प्रशासन, समता आणि न्यायावर आधारित राज्यकारभार उभा करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले असून, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे नाव अजरामर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली येथे केले.

सांगली शहरातील शिंदे मळा, अभयनगर येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, जयंत पाटील, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, विश्वजीत कदम, सत्यजीत देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

sangli news: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

३०० वे जन्मवर्ष; सांगलीत ऐतिहासिक स्मारक

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जन्मवर्ष असून, या निमित्ताने सांगली महानगरपालिकेच्या वतीने राज्यातील सर्वात उंच अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला, ही अभिमानाची बाब आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

लोकशाही, समता आणि न्यायाचा आदर्श

मध्यमयुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभारात लोकशाही, समता व न्यायाची तत्त्वे स्पष्टपणे दिसतात. त्यामुळेच अहिल्यादेवींना पुण्यश्लोक ही उपाधी प्राप्त झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. अहिल्यादेवींचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला असून, महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी तर मध्यप्रदेश ही कर्मभूमी आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या त्या स्नुषा होत्या. पतीच्या निधनानंतरही त्यांनी २८ वर्षे आदर्श राज्यकारभार करून आदर्श राणीचा आदर्श घालून दिला.

भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान

मुघल आक्रमणांच्या काळात जेव्हा भारतीय संस्कृती धोक्यात होती, तेव्हा अहिल्यादेवींनी मंदिरांचे, तीर्थक्षेत्रांचे जीर्णोद्धार स्वतःच्या खर्चातून करून भारतीय संस्कृतीला नवे बळ दिले. काशी विश्वेश्वर घाट पुनरुत्थान आणि अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहिल्यादेवींच्या या कार्याचा विशेष उल्लेख केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

हेदेखील वाचा: Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला नवे संरेखन | सोलापूर–सांगली–पंढरपूर मार्गे चंदगड; 2026 मध्ये या महामार्गाच्या कामाला प्रारंभ

महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक पावले

न्यायप्रिय राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवींनी विधवांना संपत्तीचा अधिकार दिला. महिलांना शिक्षण, रोजगार व अधिकार बहाल केले. माहेश्वर येथे साडी विणकाम उद्योगाला प्रोत्साहन दिल्याने माहेश्वरी साडी आज देश-विदेशात प्रसिद्ध आहे. त्यांनी १७ प्रकारचे कारखाने सुरू केले, सैन्याची शस्त्रसामग्री स्वदेशी कारखान्यांत तयार केली आणि महिला सैन्याची पहिली तुकडी उभारली. त्या स्वतः रणांगणावर लढत असत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विकासकामांची घोषणा

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप, तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने सांगली-कोल्हापूर पूर नियंत्रणासाठी ५०० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती दिली.
महावितरणच्या सांगली-मिरज-कुपवाड क्षेत्रातील पाच नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यासाठी सुमारे १७.४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या उपकेंद्रांमुळे दर्जेदार वीजपुरवठा होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुतळ्याची वैशिष्ट्ये

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा १०.७६ मीटर उंच चबुतऱ्यासह अश्वारूढ पुतळा शिंदे मळा, अभयनगर, सांगली येथे उभारण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी १ कोटी ६९ लाख रुपये खर्च आला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. धनगरी ढोलवादनाने कार्यक्रमाला पारंपरिक रंग चढला. शेवटी सांगलीतील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निळ्या केळी, स्ट्रॉबेरी, पेरू व डाळिंबांच्या स्टॉल्सना मुख्यमंत्र्यांनी भेट देत माहिती घेतली.

एकूणच, सांगलीत उभारलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ स्मारक नसून न्याय, समता आणि आदर्श राज्यकारभाराचा प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *