वायफळे खून प्रकरण: तिघे पुण्यातून ताब्यात, अल्पवयीन मुलाचा समावेश; २ पोलिस कर्मचारी निलंबित
तासगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
वायफळे (ता. तासगाव) येथील ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके खून प्रकरणात तासगाव पोलिस व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे परिसरातून तिघांना, त्यापैकी एका अल्पवयीन मुलाला, ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाईही करण्यात आली आहे.
गुरुवारी (ता. १२) सायंकाळी, वायफळे येथे विशाल सज्जन फाळके याने साथीदारांसह ओंकार ऊर्फ रोहित फाळके याच्यावर कोयता आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात रोहित ठार झाला, तर त्याचे वडील संजय फाळके, आई जयश्री फाळके, आदित्य साठे, आशिष साठे आणि सिकंदर अरे हे पाचजण जखमी झाले.
तपासादरम्यान, पोलिसांनी मुख्य संशयित विशाल फाळके याला पुण्यातून अटक केली. आता, अनिकेत खुळे (वय १९, कात्रज, पुणे) आणि आकाश मळेकर (वय २०, पापळ वस्ती, बिबेवाडी) यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. एका संशयित अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
विशाल फाळके आणि संजय फाळके यांच्या कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. या वादातूनच विशालने पुण्यातील साथीदारांबरोबर संजय फाळके यांच्या कुटुंबावर हल्ला केला. विशालवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला ‘मोका’अंतर्गत पुण्यात शिक्षा झाली आहे.
या तपासासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी टीम सक्रिय होती. वॉरंट न बजावल्यामुळे पोलिस कर्मचारी वेदकुमार दौंड आणि पवन जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.
कामेरी अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
इस्लामपूर,(आयर्विन टाइम्स):
कोल्हापूर-पुणे महामार्गावरील कामेरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सर्जेराव कांबळे (वय ३५, इंप्रुळ) आणि अविनाश दाभाडे (वय ३१, तडवळे) यांचा मृत्यू झाला.
दोघेही कोरेगाव येथे कामासाठी गेले होते आणि रात्री गावी परतताना अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मालेवाडीत जागेच्या वादातून मारहाण
सांगली, (आयर्विन टाइम्स ):
वाळवा तालुक्यातील मालेवाडीत जागेच्या वादातून चुलत भावांमध्ये काठीने मारहाणीची घटना घडली.
तानाजी कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार, भगवान कोळेकर व इतरांनी त्यांना काठीने मारहाण केली, ज्यामुळे त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. दुसऱ्या बाजूने मंगल कोळेकर यांनी दिलेल्या तक्रारीत तानाजी व दत्तात्रेय कोळेकर यांनी त्यांच्या पतीला व मुलाला मारहाण केल्याचे म्हटले आहे.
या प्रकारांवर दोन्ही बाजूंनी आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.