मिरज पोलिसांची मोठी कारवाई

मिरज पोलिसांनी बनावट नोटा छपाई आणि वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून १.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. बनावट चलन वितरणाचा कट उधळला.

मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्ह्यातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी बनावट नोटांचे उत्पादन, छपाई, साठा आणि वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेत तब्बल १ कोटी ११ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात बनावट ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, तसेच टोयोटा इनोव्हा चारचाकी गाडीचा समावेश आहे.

बनावट चलन उत्पादनाचा मोठा डाव उधळला

ही कारवाई ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी निलजी-बामणी रोड, कोल्हापूर ब्रिजखाली (मिरज) येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी सुप्रीत काडप्पा देसाई (२२, गडहिंग्लज), राहूल राजाराम जाधव (३३, कोरोची), इब्रार आदम इनामदार (४४, कसबा बावडा), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, मालाड, मुंबई) यांना अटक केली आहे.

मिरज पोलिसांची मोठी कारवाई

कारवाई कशी उघडकीस आली

महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली), अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

पथकाने निलजी-बामणी रोडवर सापळा रचून आरोपी सुप्रीत देसाई याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ८४ बनावट नोटा (४२,००० रुपये किंमत) मिळून आल्या. पुढील चौकशीत त्याने कोल्हापूरमधील एका गुप्त छपाई केंद्रात बनावट चलन तयार होत असल्याचे कबूल केले.

छपाई केंद्रावर छापा

यानंतर पोलिसांनी राहूल जाधव याच्या कोल्हापूरातील रुईकर कॉलनीतील कार्यालयावर छापा टाकला. तिथून ६८ बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात पोलिसांनी इतर तिघांना शोधून काढले. पुणे–बेंगळुरू हायवेवरील पेठनाका परिसरात अडवण्यात आलेल्या टोयोटा इनोव्हा गाडीतून ९७.६७ लाख रुपयांच्या बनावट ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली गुन्हेवार्ता : घरफोडी टोळी जेरबंद, सोन्याची चोरी, 25 लाखांची फसवणूक आणि तंबाखू साठा जप्त

जप्त केलेला मुद्देमाल

५०० रुपयांच्या बनावट नोटा : १९,६८७ (९८.४३ लाख रुपये किंमत)

२०० रुपयांच्या बनावट नोटा : ४२९ (८५,८०० रुपये किंमत)

छपाईसाठी वापरलेले लॅपटॉप, प्रिंटर व साहित्य : १.७७ लाख रुपये

टोयोटा इनोव्हा गाडी (बिना नंबर प्लेट) : १० लाख रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,११,०६,९००

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बनावट चलन वितरणाचा कट

पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की ही टोळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांदरम्यान राज्यात बनावट नोटांचे वितरण करण्याच्या तयारीत होती. त्याद्वारे बाजारपेठ आणि निवडणूक व्यवहारांवर परिणाम घडवण्याचा प्रयत्न होत होता. आरोपींपैकी राहूल जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पूर्वीही इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांचे आवाहन

महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “बनावट चलन किंवा अशा अवैध व्यवहारांची कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवा. अशा प्रकारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या टोळ्यांचा समूळ नायनाट करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *