कोल्हापूरात खोटे सोने तारण ठेवून वैश्य बँकेची ८३ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक. अधिकृत सोनार दीपक देवरुखकरसह सात जणांवर गुन्हा दाखल.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
कोल्हापूर :
खोटे दागिने खरे असल्याचे दाखवून बँकेकडून कर्जे मंजूर करून घेत ८३ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बँकेचा अधिकृत सोनार आणि त्याच्या सहकाऱ्यांसह सात जणांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित दीपक गोपाळ देवरुखकर (रा. सनगर गल्ली, मंगळवार पेठ) हा वैश्य बँ-केकडे सोन्याचे मूल्यांकन करणारा अधिकृत सोनार म्हणून काम करत होता. त्याने स्वतःच्याच नातलगांना आणि परिचितांना खोट्या सोन्याच्या तारणावर कर्जे मंजूर करून देत बँ-केची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

💰 फसवणुकीचा प्रकार कसा घडला?
वैश्य बँकेचे व्यवस्थापक नीरज शिवाजी देशमुख (वय ३८, रा. कारंडे मळा, ताराबाई पार्क) यांनी या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार खालील सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे —
- दीपक गोपाळ देवरुखकर (अधिकृत सोनार)
- सुरेखा सुरेश डावरे
- संग्राम भीमराव पाटील
- दीपा दीपक देवरुखकर (पत्नी)
- आराध्या बाळासाहेब जाधव
- संजय दत्तात्रय पिसाळ
- विक्रम अशोक डंबे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०११ पासून बँ-केत सोने तारण ठेवून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी देवरुखकर याच्याकडे होती. बँकेत ग्राहकांनी आणलेले सोने तपासून त्याने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच कर्ज वितरित केले जात असे.
हेदेखील वाचा: इचलकरंजीत 3 शाळकरी मुली बेपत्ता — शहरात खळबळ! शाळेला जातो असे सांगून घराबाहेर
⚖️ खोट्या सोन्याच्या तारणावर मंजूर कर्जे
जुलै २०२४ मध्ये संग्राम पाटील आणि सुरेखा डावरे यांनी खोटे दागिने बँ-केत तारण ठेवले. मात्र, देवरुखकरने ते खरे असल्याचा दाखला दिला आणि त्यावर कर्ज मंजूर करून दिले. पुढे जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत त्याने आपल्या पत्नी दीपा देवरुखकर हिच्या नावाने तसेच इतर ओळखीच्या व्यक्तींच्या नावाने एकूण सहा कर्जे मंजूर करवून घेतली.
या सर्व कर्जप्रकरणातील सोने खोटे असल्याचे बँकेच्या पुनर्तपासणीत उघड झाले. परिणामी बँकेच्या नावे ८३ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.
🚨 पोलिस तपास सुरू
बँकेच्यावतीने तक्रार दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात असून, काही जणांच्या चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शहरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली असून, बँका तारण सोने तपासणी प्रक्रियेबाबत अधिक दक्षता घेत आहेत.
