jat news

jat news: जत तालुक्याचे विभाजन करून माडग्याळला स्वतंत्र तालुका करण्याच्या मागणीसाठी मंडल कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत चक्री उपोषण सुरू.

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):

जत तालुक्याचे विभाजन करून माडग्याळला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा, तसेच येथे तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालयांसह सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय कार्यालये स्थापन करावीत, या ठोस आणि दीर्घकालीन मागणीसाठी माडग्याळ येथील ग्रामस्थांनी मंडल कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जत तालुक्यात पुन्हा एकदा प्रशासकीय पुनर्रचनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

माडग्याळ तालुक्याच्या मागणीसाठी यापूर्वीही वेळोवेळी आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढण्यात आले होते. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असला, तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाच्या दिरंगाईविरोधातच हे उपोषण असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

भौगोलिक व प्रशासकीयदृष्ट्या माडग्याळ योग्य केंद्र

जत तालुक्याच्या पूर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेले मा-डग्याळ हे स्वतंत्र तालुक्यासाठी अत्यंत योग्य व व्यवहार्य ठिकाण असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. आसपासच्या अनेक गावांसाठी माडग्याळ हे नैसर्गिक संपर्ककेंद्र असून दैनंदिन व्यवहार, व्यापार व आरोग्य सेवांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे येतात.

माडग्याळ येथे तालुक्यातील सर्वांत मोठा आठवडा बाजार भरतो. या बाजारात शेळ्या-मेंढ्या, देशी अंडी, कोंबडी, भाजीपाला, स्टेशनरी तसेच दैनंदिन वापराच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. त्यामुळे माडग्याळ हे केवळ गाव न राहता संपूर्ण परिसराचे आर्थिक केंद्र बनले आहे.

jat news

आरोग्य, शेती व पशुधन बाजाराची भक्कम पायाभरणी

मा-डग्याळ येथे ग्रामीण रुग्णालय असून त्यासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. यामुळे आरोग्य सेवांसाठी नागरिकांना दूरवर जाण्याची गरज राहत नाही. याशिवाय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमिती येथे कार्यरत असून, तिच्या माध्यमातून नियमित पशुधन बाजार भरवला जातो. शेती व पशुपालनावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागासाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.

हेदेखील वाचा: jat news: संख तालुकानिर्मितीच्या मागणीला शासनाकडून सकारात्मक दखल; 5 दिवसांचे बेमुदत उपोषण स्थगित; कोणत्या मागण्या मान्य झाल्या जाणून घ्या

या सर्व बाबी लक्षात घेता माडग्याळला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देणे ही केवळ मागणी नसून, गरज असल्याचे उपोषणकर्त्यांचे ठाम मत आहे.

इतर कार्यालयांना विरोध नाही, पण माडग्याळचा हक्क हवा

संख आणि उमदी येथील अपर तहसीलदार कार्यालयांना आमचा विरोध नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचवेळी मा-डग्याळला स्वतंत्र तालुका व्हायलाच हवा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

उपोषणाला व्यापक पाठिंबा

बुधवारी सुरू झालेल्या उपोषणात उपसरपंच बाळासाहेब सावंत, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, लिंबाजी माळी, पिराप्पा कांबळे, कामाण्णा बंडगर, जेटलिंग कोरे, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष लिंगाप्पा कोरे, राजू बुध्याळ, राजू कांबळे, लक्ष्मण कांबळे, नागेश ऐवळे, मारुती माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

लाकडेवाडीचे माजी सरपंच एकनाथ बंडगर, डॉ. शेखर हिट्टी, डॉ. सार्थक हिट्टी, डॉ. भीमाण्णा माळी, डॉ. प्रदीप शिंदे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

मा-डग्याळ स्वतंत्र तालुक्याच्या मागणीला आता जनसमर्थन मिळत असून, शासनाने या प्रश्नावर सकारात्मक व तातडीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Villagers Launch Indefinite Rotational Hunger Strike Demanding Madgyal Taluka

Jat (Irwin Times Correspondent):
Villagers of Madgyal have begun an indefinite rotational hunger strike in front of the Mandal office, demanding the formation of Madgyal as an independent taluka by dividing Jat taluka. They are also seeking the establishment of all taluka-level administrative offices, including the Tehsildar and Sub-Registrar offices, in Madgyal.

The demand has been raised earlier through several agitations, and a proposal has already been submitted to the government. However, the lack of a concrete decision has led to growing dissatisfaction among residents. Protesters stated that Madgyal, located centrally in the eastern part of Jat taluka, is a practical and necessary choice for a new taluka.

Madgyal hosts the largest weekly market in the region and has well-developed facilities such as a rural hospital and an agricultural market sub-committee with a livestock market. While the protesters clarified that they do not oppose the sub-tehsil offices at Sankh and Umadi, they firmly insist that Madgyal must be granted independent taluka status.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *