Jat Crime News: जत तालुक्यातील उमदी येथील २६ वर्षीय तरुणाचा जतमध्ये नग्न अवस्थेत निर्घृण खून. जमीन वादातून हत्या झाल्याचा संशय; दोन पोलीस पथकांकडून तपास सुरू.
जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी
जत तालुक्यातील उमदी येथील २६ वर्षीय तरुणाचा जत शहरात अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. जत–सातारा रस्त्यावरील बाजार समितीच्या जनावर बाजार व डाळिंब मार्केट परिसरातील निर्जन ठिकाणी नग्नावस्थेत, तोंड व डोके ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव विकास मलकारी टकले (वय २६, रा. घुलेवस्ती, उमदी) असे आहे. जत यात्रा सुरू असताना आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असतानाच हा खून उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयताचे तोंड व डोके इतक्या भीषणरीत्या ठेचले गेले होते की, सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटू शकली नव्हती. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही घटनास्थळी भेट देत सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.

आईला दवाखान्यात सोडून जत यात्रेला गेला अन् परतलाच नाही
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विकास टकले हा आपल्या आई तीर्थाबाई यांच्यासोबत उमदी येथे वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळी आईच्या गुडघ्याच्या त्रासामुळे त्यांना माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. उपचारानंतर आईला गावाकडे पाठवून विकास हा एकटाच जत यात्रेला जात असल्याचे सांगून निघून गेला.
मात्र सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. त्याचा मोबाईल संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या आईने व बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने जत परिसरात शोधाशोध केली; मात्र तो सापडला नाही.
बाजार समिती परिसरात मृतदेह आढळला
शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता जत येथील बाजार समितीच्या जनावर बाजार परिसरात एका तरुणाचा नग्न अवस्थेत, डोके ठेचून खून झाल्याचे निदर्शनास आले. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती जत पोलिसांना दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व उमदीचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.
तपासानंतर हा मृतदेह उमदी येथील विकास टकले याचाच असल्याचे स्पष्ट झाले. आई, बहीण व नातेवाईकांनी कपडे व शरीरावरील खुणांवरून ओळख पटवली.
शवविच्छेदनासाठी मृतदेह सांगलीला
मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र खून दगडाने ठेचून की धारदार शस्त्राने करण्यात आला, हे स्पष्ट होण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जमीन वादातून खून झाल्याचा आरोप
घटनास्थळी नातेवाईकांनी विकासचा खून जमीन वादातून झाल्याचा आरोप केला आहे. उमदी येथील सुमारे सात एकर जमिनीचा वाद गेल्या दहा वर्षांपासून भावकीमध्ये सुरू असून, त्याच वादातून विकासची हत्या करण्यात आल्याचा संशय आई व बहिणीने व्यक्त केला आहे. पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत.
संशयित आरोपींच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषण शाखा व जत पोलीस अशी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथकही दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या निर्घृण खुनामुळे जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Umadi Youth Brutally Murdered in Jat | Land Dispute Suspected | Jat Crime News
Jat | Correspondent:
A 26-year-old youth from Umadi village in Jat taluka was brutally murdered, sending shockwaves across the area. The victim, identified as Vikas Malkari Takale, was found dead in a naked condition with severe head and facial injuries in a deserted area near the animal market and pomegranate market yard on the Jat–Satara road.
The incident came to light on Friday afternoon. Due to the severity of injuries, police were initially unable to identify the body. Jat police rushed to the spot and conducted a panchnama, while District Superintendent of Police Sandeep Ghuge visited the site and ordered a thorough investigation.
Preliminary information suggests that the victim had come to Jat to attend the local fair after taking his mother to a hospital. He later went missing. Relatives have alleged that the murder may be linked to a long-standing land dispute. Police have formed two teams to trace the accused, and further investigation is underway.
