मिरज तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणी आणि तिच्या वडिलांवर खुरप्याने जीवघेणा हल्ला केला. दोघेही जखमी असून उपचाराधीन. आरोपी अक्षय पाटीलवर गुन्हा दाखल; तो सध्या फरार. पोलिसांचा तपास सुरू.
मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
मिरज तालुक्यातील एका गावात एकतर्फी प्रेमातून उभा राहिलेल्या रागातून तरुणी आणि तिच्या वडिलांवर खुरप्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित अक्षय सुभाष पाटील (वय 26) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पसार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पाटील याला गावातील एका तरुणीबद्दल एकतर्फी प्रेम होते. त्याने मुलीच्या कुटुंबाकडे विवाहाची मागणीही करून ठेवली होती. मात्र मुलीच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारल्याने मुलीचे अन्यत्र लग्न ठरविण्यात आले. तिचा साखरपुडा निश्चित झाला असून तयारी सुरू असल्याची माहिती अक्षयला मिळताच त्याने संतापाच्या भरात हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे बारा वाजता अक्षयने मुलीच्या घरात घुसून तिच्या वडिलांवर खुरप्याने अचानक प्राणघातक हल्ला चढवला. वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवरही त्याने हल्ला केला. यात मुलीच्या हाताच्या बोटाला तर तिच्या वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या गंभीर प्रकारानंतर मि-रज ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित अक्षय पाटीलवर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गुरव करीत आहेत. घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.
