सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली शहरातील वर्दळीच्या पुष्पराज चौकात गुरुवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास तब्बल ११ लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने एका ८७ वर्षीय वृद्धाच्या हातून लंपास करण्यात आले. ही घटना भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, विश्रामबाग सांगली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या तीन तासांत या जबरी चोरीचा छडा लावत दोघा चोरट्यांना अटक केली असून १५ लाख १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनेचा थरार – क्षणात बॅग लंपास
कर्मवीर पतसंस्थेसमोर ही घटना घडली. पत्रकारनगर , सांगली येथील रहिवासी धनचंद्र भाऊराव सकळे (वय ८७) हे आपल्या कुटुंबातील लग्नकार्यामुळे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पतसंस्थेत येत होते. त्यांच्या हातात हिरव्या रंगाची पिशवी होती, ज्यामध्ये जवळपास ११ लाखांचे दागिने होते. ते चारचाकीतून उतरतात न उतरतात, तोच आधीपासून पाळत ठेवणाऱ्या चोरट्याने स्पोर्ट्स बाईकवरून येत क्षणात बॅग हिसकावून शंभरफुटी रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. या प्रकारामुळे सकळे यांना मोठा धक्का बसला.
पोलिसांची तातडीची हालचाल
घटनेनंतर विश्रामबाग सांगली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक ऋतु खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी विमला एम (IPS), आणि विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांची तात्काळ रचना करण्यात आली.
गोपनीय माहिती आणि अचूक कारवाई
गोपनीय बातमीदारामार्फत पोहेकॉ विशाल भिसे, संदिप साळुंखे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर व गणेश बामणे यांना माहिती मिळाली की, आरोपी अमोल महेश माने (वय ३०, रा. हरीपूर) यानेच हा गुन्हा केला आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपला साथीदार नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय २९) याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल ‘छोटा हत्ती’ टेम्पोमध्ये ठेवला होता, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलदेखील कार्यालयाबाहेर लावलेली होती.
जप्त मुद्देमालाची यादी
विश्रामबाग सांगली पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
* सोन्याचे दागिने – चप्पल हार, तोडे, काळ्या मण्यांची माळ, अंगठी, कर्णफुले (एकूण सुमारे १० लाख रुपये)
* सुझुकी हयाती मोटरसायकल (MH10AS-4935) – ₹५०,०००
* टाटा छोटा हत्ती टेम्पो (MH11G7149) – ₹४,००,०००
* स्टीलचा डबा, हिरवी पिशवी, चेकबुक, लॉकरची चावी इत्यादी असा एकूण १५,१२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक तपास सुरुच
सदर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कविता नाईक या करत आहेत. या आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे काय, याचा तपासही सुरू आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास बळकट झाला आहे. विश्रामबाग सांगलीपोलिसांचे वेगवान पथक, तांत्रिक कौशल्य आणि घटनास्थळावरील जलद प्रतिसाद याचे हे यश ठरले आहे.