सारांश: सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पलूस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांना २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून एकूण ८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सापळा रचून लाच घेताना अटक केल्यानंतर गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी लाच मागणीबाबत तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पलूस पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासो गायकवाड यांना २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून ८ लाख रुपयांची मागणी करून त्यातील २ लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी महेश गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे?
तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून, ते फोरेक्स ट्रेडिंग व्यवसाय देखील करतात. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिसांनी तपासाअंती त्यांना आरोपी म्हणून दाखल केले. ४ जानेवारी २०२५ रोजी पलूस येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेची भीती दाखवून पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील तडजोडीअंती २ लाख रुपये घेतल्यानंतर तक्रारदाराला अटकपूर्व जामीन घेण्यास सांगून सोडण्यात आले.
२० जानेवारी २०२५ रोजी उच्च न्यायालयाने तक्रारदाराला जामीन मंजूर केला. त्यानंतर देखील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी उर्वरित ८ लाख रुपये देण्यास तगादा लावला. २५ मार्च २०२५ रोजी त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावून पैसे न दिल्यास त्यांच्या चारचाकी वाहनाची जप्ती आणि फोरेक्स ट्रेडिंगशी संबंधित नवीन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
हेदेखील वाचा: crime news: मोबाईलच्या वादातून 7 वीतील मुलाने महिलेचा केला खून – मराठवाडा हादरला!
सापळा रचून रंगेहात पकडले
या सातत्यपूर्ण bribe मागणीमुळे तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २ एप्रिल २०२५ रोजी पलूस पोलीस ठाण्यातील अधिकारी कक्षात आरोपी महेश गायकवाड यांच्याकडून २ लाख रुपयांची bribe स्वीकारण्याच्या वेळी सापळा रचून त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
गुन्हा दाखल आणि पुढील कारवाई
या कारवाईनंतर महेश गायकवाड यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांची चमू आणि नागरिकांना आवाहन
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे आणि पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, सीमा माने आणि धनंजय खाडे यांचा समावेश होता.
लाच मागणीच्या प्रकरणांबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदार www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच हेल्पलाईन क्रमांक १०६४ किंवा ९५५२५३९८८९ वर तक्रार दाखल करू शकतात.