स्वारगेट

स्वारगेट – पुणे,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये एका नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (ता. २५) पहाटे पाचच्या सुमारास घडलेला हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून, महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्वारगेट
स्वारगेट स्थानकावर तरुणीवर अत्याचार झाला तीच ही बस

घटना कशी घडली?
फलटणला जाणारी बस शोधत असलेल्या २६ वर्षीय तरुणीला आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) याने दिशाभूल करून रिकाम्या बसमध्ये नेले. त्यानंतर संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने ही घटना आपल्या सहकाऱ्यांना व कुटुंबीयांना सांगताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत.

हे देखील वाचा: क्राईम / रहस्यमय स्टोरी 2 : काळोखातला कट / The Dark Conspiracy

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
गाडे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर स्वारगेट पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा, तर पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात मोबाईल व सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटली असून, पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
या घटनेने एसटी बस स्थानकातील सुरक्षेच्या व्यवस्थेचा भेद उघड झाला आहे. अत्याचाराची घटना झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या, मात्र बस स्थानकात इतक्या मोठ्या संख्येने सुरक्षारक्षक तैनात असताना देखील ही घटना कशी घडली? यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट बसस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या २३ सुरक्षारक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Kolhapur crime news: व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी करून वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी 46 वर्षीय सावकारास अटक; बदनामी करण्याची दिली धमकी

प्रशासनाच्या तातडीच्या हालचाली
– एसटी प्रशासन: स्वारगेट आगाराचे व्यवस्थापक आणि बसस्थानक प्रमुख यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश.
– सुरक्षारक्षकांची बदल: २३ सुरक्षारक्षकांवर कारवाई; त्यांच्या जागी जिल्हा सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक नियुक्त होणार.
– बस विल्हेवाट: पाच निर्लेखित बस गुरुवारी (ता. २७) बाद करण्यात येणार.
– परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया: “सुरक्षा व्यवस्थेत कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास निलंबन केले जाईल.”

स्वारगेट

महिला सुरक्षा योजनेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे महिला सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. महिलांसाठी वेगवेगळ्या सुरक्षा योजना जाहीर केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात त्या कितपत प्रभावी ठरतात, यावर विचार करण्याची गरज आहे. राज्यातील प्रमुख बस स्थानकांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना, गस्त घालणाऱ्या पोलिसांची संख्या वाढवणे, सीसीटीव्ही प्रणाली अधिक प्रभावी करणे यांसारख्या उपाययोजनांची मागणी आता होत आहे.

हे देखील वाचा: योग, प्राणायाम करत नसाल तर निदान दीर्घ श्वसन तरी घ्यायलाच हवे … जाणून घ्या दीर्घ श्वसनाचे 9 फायदे / Know benefits of deep breathing

राजकीय प्रतिक्रिया आणि पुढील दिशा
– हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष): “सरकार महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. पोलिस प्रशासन निष्क्रिय झाल्याचे या घटनेने सिद्ध केले.”
– राष्ट्रीय महिला आयोग: अध्यक्ष विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
– पोलिस आयुक्तांवर दबाव: शहरातील सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

शहरातील सुरक्षेचे आव्हान
पुणे हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असून, येथे अनेक महिला नोकरी व शिक्षणासाठी येतात. मात्र, अशा घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांनी अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तयार करावीत आणि बसस्थानकांमध्ये सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून आंदोलने करण्यात आली तर सुरक्षारक्षक केबिनची तोडफोड करण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी संताप व्यक्त करत निषेध नोंदविला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानकातील सुरक्षारक्षकांच्या केबिनची तोडफोड केली, तसेच स्वारगेट व्यवस्थापन, परिवह्नमंत्री आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *