मिरज पोलीस कारवाईत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असलेला गुन्हेगार अटकेत
आयर्विन टाइम्स / मिरज
गणेशोत्सव, आगामी नवरात्रोत्सव आणि निवडणुका लक्षात घेता, मिरज शहरातील अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या व्यापारावर पोलीसांनी कडक पावले उचलली आहेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने टाकलेल्या धाडीत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, नशेच्या ६०० गोळ्या व दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईने मिरज शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
अटक आरोपींची माहिती:
या प्रकरणी मिरज पोलिसांनी धनंजय प्रदीप गाडे, (वय २२, राह. मालगांव रोड, सुभाषनगर, मिरज), ओंकार संभाजी साळुंखे, (वय २२, राह. मंगळवार पेठ, मिरज)
महम्मदरफीक सादीक गोदड, (वय २४, राह. गोदड मळा, टाकळी रोड, मिरज) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६०० नायट्रावेट १० नावाच्या गोळ्या (किंमत ₹ ४,५२०) – या गोळ्या नशेसाठी वापरण्यात येतात, आणि मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. त्या जप्त करण्यात आल्या.
याशिवाय हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल (MH-10-BH-7229 किंमत ₹ २५,०००) , होंडा अॅक्टीवा मोपेड (MH-09-DJ-8478 किंमत ₹ २५,०००) असा एकूण ५४,५२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर, तसेच मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी शहरात अवैध अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक सतत कार्यरत होते.
दि. ११ सप्टेंबर रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल सूरज पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, धनंजय गाडे हा दोन साथीदारांसोबत मिरजमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागील एका बोळीत नशेच्या गोळ्या विकण्यासाठी थांबले आहेत. त्वरित पोलीसांनी सापळा रचला आणि त्यांना रंगेहात पकडले.
तपासात असे उघड झाले की, आरोपींनी मिरज आणि आसपासच्या परिसरात नशा करणाऱ्या लोकांना जास्त किंमतीत नायट्रावेट गोळ्यांची विक्री करण्याची योजना आखली होती.
अट्टल गुन्हेगार ओंकार साळुंखेच्या कारनाम्यांचा पर्दाफाश:
यातील एक आरोपी, ओंकार संभाजी साळुंखे, हा मिरजमधील अट्टल गुन्हेगार असून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. तो आधीपासूनच पोलीस अभिलेखावरील शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याची अंमली पदार्थ विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली पोलीस दलाच्या या धाडसी कारवाईमुळे miraj शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. भविष्यातही असे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहा. पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सूरज पाटील, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, विक्रम खोत, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख आणि मोहसिन टिनमेकर यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हे देखील वाचा: Electric shock: शेतात विजेच्या धक्क्याने 4 जणांचा मृत्यू: गणेशपूरमध्ये भीषण घटना
सांगली पोलीस दलाच्या या त्वरित कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर मोठा आघात झाला आहे, आणि हे अभियान अजूनही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे