वाचन प्रेरणा दिन 2026

महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा होणार. महात्मा फुले यांच्या साहित्यावर अभिवाचन, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शने आणि रोजगाराभिमुख कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ यंदा १५ ऑक्टोबर रोजी राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यावर आधारित अभिवाचन, परिसंवाद, चर्चासत्रे आणि पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागाने दिल्या आहेत. यासंदर्भात विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे, वाचनाची आवड वाढविणे आणि समाजात वाचन संस्कृती रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदा महात्मा फुले यांच्या ‘तृतीयरत्न’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या साहित्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत उपक्रम

राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयांतील मराठी भाषा अधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी स्थानिक साहित्यिकांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ग्रंथालये, महाविद्यालये, तंत्रमहाविद्यालये आणि पदविका संस्थांमध्ये, तर शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये वाचनविषयक उपक्रम आयोजित करावेत. सांस्कृतिक व पर्यटन विभाग तसेच नगरविकास विभागानेही त्यांच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये कार्यक्रम राबवावेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विज्ञान, तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख विषयांवर भर

वाचन प्रेरणा दिनाचे कार्यक्रम केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, आरोग्य, संगणक आणि अवकाश विज्ञान यांसारख्या विषयांचाही समावेश करण्यात येणार आहे. तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच त्यांना लेखन आणि प्रकाशन क्षेत्रातील संधींची माहिती मिळावी, यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम आयोजित केले जातील.

अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तकनिर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई-बुक, स्व-प्रकाशन, युनिकोडचा वापर, ऑनलाइन पुस्तकविक्री, लेखक-प्रकाशक करार, संहिता लेखन, विश्वकोशविषयक माहिती तसेच लघुपट आणि माहितीपट लेखन अशा विषयांवर कार्यशाळा व मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

वाचन प्रेरणा दिन 2026

‘मराठी वाचन कट्टा’ आणि पुस्तक भेट उपक्रम

वाचन संस्कृती अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला किमान एक पुस्तक भेट देऊन वाचनासाठी प्रोत्साहित करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. विविध संस्थांनी समाजमाध्यमांवर ‘मराठी वाचन कट्टा’ निर्माण करावा. आभासी किंवा प्रत्यक्ष साहित्य संमेलने आयोजित करावीत, तसेच विकिपीडियासारख्या माध्यमांवर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे दृकश्राव्य संदेश संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, एफएम रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क आणि समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केले जाणार आहेत. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाचे कार्यक्रम प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून व्यापक स्वरूपात राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

हेदेखील वाचा: साखरेच्या दराचा इतिहास जाणून घ्या : सव्वा रुपयांवरून पन्नाशीत; ऊस मात्र चार पैशांवरून साडेतीन रुपयांपर्यंत; 66 वर्षांतील दरवाढीचे धक्कादायक चित्र

मराठी साहित्य संस्थांची मदत घेणार

जिल्हास्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ तसेच संबंधित क्षेत्रातील साहित्य संस्थांची मदत घेता येणार आहे. या संस्थांनी वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

भाषा संचालनालय आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकांची तसेच मराठी भाषा विभाग आणि त्याच्या अधीनस्थ कार्यालयांच्या संकेतस्थळांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे.

शासकीय कामकाजात मराठीच्या वापरावरही भर

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांनीही मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांची माहिती संबंधित कार्यालयांना करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

वाचनाची आवड वाढविणे, मराठी साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणे आणि दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर वाढविणे, या उद्देशाने यंदाचा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे. संबंधित शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *