सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल प्रक्रिया जोरात सुरू. ऑनलाईन प्रणालीतील अडचणी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाची ऑफलाईन अर्जभरतीला परवानगी. नगराध्यक्ष पदासाठी ५६ आणि सदस्य पदासाठी ७११ अर्ज दाखल.
सांग-ली जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार दुपारी ३ वाजेपर्यंत असून रविवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत.

रविवार अखेरपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५६ तर सदस्य पदासाठी तब्बल ७११ अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवार सार्वजनिक सुट्टी असूनही राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुभा कायम ठेवली होती. त्यानुसारच रविवारी एका दिवसात १६ नगराध्यक्ष आणि ३६४ नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल झाले.
हेदेखील वाचा: सांगलीचा अभिमान! पोलीस हवालदार अविनाश लाड यांचे एशिया मास्टर अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण यश
दरम्यान, नामनिर्देशनाची ऑनलाईन संगणक प्रणाली वारंवार ठप्प पडत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून येत होत्या. प्रणालीवर वाढलेला ताण आणि अंतिम दिवस जवळ आल्याने निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घेत ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा दिली. यामुळे उमेदवारांना अन्याय होऊ नये तसेच सर्वांना समान संधी मिळावी, हा आयोगाचा उद्देश आहे.
उरुण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत, पलूस या सहा नगरपालिकांसह शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू आहे. अंतिम दिवस असूनही उमेदवारांचा उत्साह कायम असून निवडणूक वातावरण तापू लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या ऑफलाईन मुभेमुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
