सायली कांबळे

 🌸विटा महोत्सवात आयोजित राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धेत सांगोल्याची कुमारी सायली कांबळे हिने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

विटा / सांगोला (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
विटा शहरात दरवर्षी पारंपरिक थाटात साजरा होणारा विटा महोत्सव यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच राज्यस्तरीय सौंदर्यवती स्पर्धा ही विशेष आकर्षण ठरली. राज्यभरातून तब्बल ४० स्पर्धक सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत सांगोल्याची कुमारी सायली कांबळे हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने परीक्षकांची मने जिंकली. तिच्या सादरीकरणाला आणि वेशभूषेला उच्च दर्जाचे गुण मिळाले. परिणामी सायलीने प्रथम क्रमांकाचे ‘सौंदर्यवती’ पारितोषिक पटकावले. तिला ₹११,००० रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सायली कांबळे

सायलीच्या रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी सौ. नीलम बाबर यांनी सांभाळली होती. त्यांच्या उत्कृष्ट मेकअप आणि कलात्मक सादरीकरणामुळे सायलीचे व्यक्तिमत्व अधिक खुलून आले. सौंदर्य आणि सादरीकरण या दोन्हींच्या अप्रतिम संगमामुळे परीक्षकमंडळाने सायलीला विजेतेपदासाठी निवडले.

विजयानंतर सायलीचा सन्मान आमदार सुरेश खाडे आणि गवळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या हस्ते सायलीला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले, तसेच तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे सर्वांनी कौतुक केले.

हेदेखील वाचा: ईश्वरपूरमध्ये धक्कादायक घटना/Shocking incident — किरकोळ वादातून मैत्रिणीचा गळा आवळून खून

कुमारी सायली कांबळे सध्या मिशन हॉस्पिटल, मिरज येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती सांगोला महाविद्यालयातील प्रा. डॉ. विधीन कांबळे यांची कन्या आहे. तिच्या या यशामुळे सांगोला तालुक्यात अभिमानाची भावना पसरली आहे.

तर सायलीची वेशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्या सौ. नीलम बाबर या व्यावसायिक ब्युटीशियन असून, त्या सांगोला शहरात त्यांच्या उत्तम कलाकौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सायलीचे व्यक्तिमत्व स्पर्धेत झळकले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सायली कांबळे आणि नीलम बाबर यांच्या या यशाबद्दल सांगोला परिसरातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *