🔹 जत साखर कारखाना जयंत पाटील यांनी कायदेशीर मार्गाने विकत घेतल्याचे सुरेश शिंदे यांचे वक्तव्य. आमदार पडळकरांनी कारखाना बंद करून दाखवावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हिताशी खेळ करू नका, असा इशारा.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी, जत)
जत : जतचा साखर कारखाना पूर्णपणे कायदेशीर मार्गाने विकत घेतलेला असून तो सध्या व्यवस्थित सुरू आहे. तरीदेखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कारखान्याला बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी तो कारखाना बंद करूनच दाखवावा, असे खुले आव्हान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते सुरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

⚖️ “कारखाना कायदेशीर लिलावातून विकत घेतलेला”
पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, “सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जामुळे ज-तचा साखर कारखाना लिलावात काढण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून जयंत पाटील यांनी हा कारखाना विकत घेतला आहे. त्यामुळे या व्यवहारावर शंका घेण्याचे काहीही कारण नाही.”
ते पुढे म्हणाले की, “आमदार पडळकर कारखान्याविरोधात बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि चांगल्या प्रकारे सुरू असलेला उद्योग बंद करण्याच्या मागे लागले आहेत. हे वर्तन शेतकरीहिताविरोधी असून कारखान्यातील कामगार आणि शेतकरी यांच्याशी अन्याय करणारे आहे.”
🚜 “जयंत पाटील यांच्या प्रयत्नांनी जत तालुक्याला पाणी व ऊसउद्योग”
शिंदे यांनी स्पष्ट केले की, “जयंत पाटील यांच्या पुढाकाराने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्यात पाणी आणले. तसेच कर्नाटक राज्यातून अतिरिक्त पाणी आणून जत पूर्व भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची मोठी मदत झाली. परिणामी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊसाची लागवड केली आहे. सध्या जत साखर कारखान्याचा बॉयलर पेटविण्यात आला असून लवकरच ऊस तोडणी आणि वाहतूक सुरू होणार आहे.”
“अशा परिस्थितीत आमदार पडळकर हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांच्या राजकीय हेतूंसाठी शेतकऱ्यांच्या हिताला तिलांजली देण्यासारखे आहे,” असे ते म्हणाले.
💧 “वारणेतून सहा टीएमसी पाणी राखीव”
शिंदे यांनी सांगितले की, “जयंत पाटील यांनी ज-त तालुक्याच्या शेती आणि पाणी योजनांसाठी वारणेतून सहा टीएमसी पाणी कायमस्वरूपी राखीव ठेवले आहे. त्यामुळेच आज जत तालुक्यातील शेतीला चांगले दिवस आले आहेत. अशा नेत्यांवर उठसूट टीका करणे आणि विकास रोखण्याचे काम करणे उचित नाही.”

🏛️ “विकासाबद्दल बोलू नका, काम करून दाखवा”
शिंदे यांनी आमदार पडळकरांना उद्देशून म्हटले, “जत तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावेत. फक्त घोषणा करून किंवा टीका करून विकास होत नाही. त्यांनी सांगावे — ज-त आरटीओ कार्यालयाचे काय झाले? उमंदी येथील नवीन बस आगाराचे काम कुठे पोहोचले? एमआयडीसी प्रकल्पाचे काय झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदारांनी जनतेला द्यावीत.”
ते पुढे म्हणाले की, “आमदार पडळकर हे बाहेरून लोकांना आणून जातीपातीचे राजकारण करत आहेत. अशा पद्धतीने समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी त्यांनी खऱ्या अर्थाने तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.”
🧾 “आटपाडी आणि विट्याचे कारखाने बंद का?”
शिंदे यांनी आमदार पडळकरांना आणखी एक प्रश्न विचारला — “सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा साखर कारखाना आणि विट्याचा नागेवाडी साखर कारखाना हे दोन्ही शेतकरी सभासदांचे असूनही ते का बंद पडले? त्याबाबत आमदारांनी जनतेसमोर उत्तर द्यावे.”
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, उत्तम चव्हाण, लक्ष्मण कोडग, महिला आघाडीच्या सुवर्णा अलगूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
