जत नगरपरिषद निवडणूक

जत नगरपरिषद निवडणुकीत चौथ्या दिवसाअखेर चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात तिरंगी स्पर्धा रंगणार.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता गती घेत आहे. चौथ्या दिवसाअखेर एकूण चार उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी दिली.

जत नगरपरिषद निवडणुकीत


■ सुरुवातीला संथ गती, आता उमेदवारांची हालचाल सुरू

१० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली, तरी पहिल्या तीन दिवसांत एकही उमेदवार पुढे आला नव्हता. मात्र, गुरुवारी चौथ्या दिवशी काही प्रमुख उमेदवारांनी अर्ज सादर करून निवडणूक चुरशीची चाहूल दिली आहे.

अर्ज प्रक्रियेत वेळ जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारांना आवश्यक असलेल्या विविध कागदपत्रांची पूर्तता. विशेषतः आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी कार्यालयात कागदपत्रे सादर करून पावती घेणे, ती उमेदवारी अर्जासोबत जोडणे, तसेच स्थावर-जंगम मालमत्ता आणि नवीन बँक खाते उघडणे यांसारख्या औपचारिकता पूर्ण कराव्या लागत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरत आहे.

हेदेखील वाचा: जत नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची एकजूट; सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित; 23 जागांवर ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार


■ चौथ्या दिवशी दाखल झालेले अर्ज

गुरुवारी (ता. १३ नोव्हेंबर) झालेल्या अर्ज सादरीकरणात काही उल्लेखनीय उमेदवार पुढे आले —

  1. हर्षवर्धन संजय कांबळे, पुत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे — यांनी प्रभाग क्र. ४ मधून अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला.
    या वेळी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील, व्यापारी मंजू मोगली, विनोद कांबळे, प्रशांत ऐदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
  2. विक्रम शिवाजीराव ताड, भा.ज.पा.चे युवक नेते व माजी नगरसेवक कै. विजय ताड यांचे बंधू — यांनी प्रभाग क्र. ६ मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आपला अर्ज दाखल केला.
    या वेळी चर्मकार संघ नेते किरण शिंदे, म.न.से. नेते कृष्णा कोळी आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  3. प्रमोद डोळळी आणि अमीर नदाफ यांनी देखील आज नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

■ निवडणुकीची पुढील प्रक्रिया

१७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. जत नगरपरिषदेमध्ये एकूण ११ प्रभागांसाठी २३ नगरसेवक पदे आणि एक नगराध्यक्ष पद असे मिळून निवडणूक होत आहे.

जत नगरपरिषद निवडणुकीत


■ नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी स्पर्धा

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे —

  • राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) शिंदे यांचे नाव जाहीर झाले आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट एकत्र) यांनी माजी सभापती सुरेश शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
  • भा. ज. पा. कडून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉ. रवींद्र आरळी यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

■ राजकीय समीकरणे आणि तिरंगी रंगत

जत नगरपरिषद निवडणूक तिरंगी स्वरूप घेते आहे. मात्र, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जयंत पाटील गट यांच्यातील राजकीय धोरणात्मक निर्णय ही निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत. एकत्रित झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या यशाचे भवितव्य काँग्रेसच्या रणनीतीवर अवलंबून राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed