जत येथील श्री यल्लमादेवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून गंधोटीच्या दिवशी हजारो भाविकांनी नवस फेडला. महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखो भाविकांची उपस्थिती.
जत,(आयर्विन टाइम्स विशेष प्रतिनिधी)-
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये अपार श्रद्धा असलेल्या जतची श्री यल्लमा देवी यांच्या वार्षिक यात्रेला आज सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रेच्या मुख्य दिवसांपैकी आजचा पहिला प्रमुख दिवस गंधोटीचा असून, सकाळपासूनच ‘उदे गं आई उदे…’ या जयघोषाने संपूर्ण यात्रा परिसर दुमदुमून गेला. हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपले नवस श्रद्धेने फेडले.

नवसाला पावणारी देवी म्हणून जतची श्री यल्लमा देवी सर्वदूर प्रसिद्ध आहे. जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, कार्यात यश मिळावे, आजारपणातून मुक्ती मिळावी या भावनेतून भाविक देवीला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर या यात्रेच्या दिवशी भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होत आपला नवस फेडतात. येथील पवित्र कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरण्याची परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
यात्रा स्थळावर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी व स्नानासाठी कुंडात पुरेशी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून प्रशासन सतर्क आहे.
The annual Shri Yallamma Devi Yatra at Jat has begun with great enthusiasm, with thousands of devotees fulfilling their vows on the day of Gandhoti. Lakhs of devotees from Maharashtra and Karnataka are in attendance.
The yatra has three main days; however, it will continue until the 21st. To ensure the smooth conduct of the entire event, the Shri Yallamma Pratisthan and the local administration have made meticulous arrangements. Under the guidance of Shrimant Shardulraje Dafale, all members of the yatra committee are working tirelessly round the clock.
यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होत असून लाखो भाविक जत नगरीत दाखल होत आहेत. जत तालुक्यासह मुंबई, पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड, इंडी, बिदर, सोलापूर आदी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने मुक्कामाला येतात. बहुतांश भाविक तीन दिवस यात्रा स्थळी मुक्काम करतात. दुसऱ्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून तिसऱ्या दिवशी ‘किच पडल्यानंतर’ भाविक यात्रा स्थळ सोडतात. दरवर्षी जवळपास चार लाखांहून अधिक भाविक या यात्रेला हजेरी लावत असल्याचे चित्र आहे.

यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारलेली भव्य बाजारपेठ. यात्रा परिसरात मेवा-मिठाई, सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू, गरम लोकरीचे कपडे, खेळणी, हॉटेल्स, चायनीज पदार्थ, रसवंतीगृहे आदी विविध दुकाने व स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. करमणुकीसाठी आकाश पाळणे, डिज्नेलँड, ‘मौत का कुआ’, जादूगारांचे खेळ आणि तमाशे यामुळे यात्रेचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
ही संपूर्ण यात्रा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडावी यासाठी श्री यल्लमा प्रतिष्ठान आणि स्थानिक प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले आहे. श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची चोख व्यवस्था बजावली जात आहे. यात्रेच्या नियोजनात अरुण उर्फ बारू शिंदे, संग्राम राजेशिर्के, कैलास गायकवाड, अनिल शिंदे, मोहन मानेपाटील, मोहन शिंदे, मोहनराव चव्हाण, विजू कोळी, रमेश पवार, पाचंगे, पापा सनंदी, अमोल डफळे, सलीम शेख, गणतराव कोडग, चंद्रजीत खानविलकर, चंद्रकांत कोळी, हर्षद गवंडी, श्री. जाधव, वसंत जाधव, अनिकेत घोंगडी, ज्ञानेश्वर धुमाळ, सुमित कोडग, मेजर सुनील चव्हाण, नेमिनाथ जैन आदी यात्रा कमिटीचे सदस्य अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम असलेली जतची श्री यल्लमादेवी यात्रा सध्या संपूर्ण परिसराला भक्तीमय वातावरणाने भारून टाकत असून, भाविकांच्या मनात आई यल्लमादेवीविषयीचा विश्वास अधिक दृढ करत आहे.
