🪔 एसटीच्या ८५ हजार कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ६ हजारांची दिवाळी भेट; वेतनवाढीचा फरक आणि १२,५०० रुपयांच्या अग्रीमचा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा.
मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ‘गोड’ ठरणार आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळातील ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना ६ हजार रुपये सानुग्रह अनुदानाच्या स्वरूपात दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.

या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, तसेच विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असली तरी शासनाने त्यांच्या पाठिशी उभे राहताना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीही आनंदी व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.”
हेदेखील वाचा: महिला उद्योजकतेसाठी नाबार्डच्या योजना – स्वावलंबन व सशक्तीकरणाचा नवा मार्ग
याशिवाय, २०२०-२४ दरम्यानच्या वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच, पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्यासही शासनाने परवानगी दिली आहे.

एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवणार आहे. खासगी व शासकीय सहभागी तत्वावर महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असून, उत्पन्न वाढवण्यासाठीही ठोस पावले उचलली जाणार आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, दिवाळी भेटीसाठी शासनाकडून ५१ कोटी रुपये मंजूर झाले असून, सण अग्रीमसाठी ५४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळणार असून, दीर्घ काळानंतर त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
