इचलकरंजीत तीन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटनांनी शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपास आणि शोधमोहीम सुरू.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
इचलकरंजी :
शाळेला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेल्या तीन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याच्या सलग घटनांमुळे इचलकरंजी शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन मुली एका माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थिनी असून, आणखी एक अल्पवयीन मुलगी सहकारनगर परिसरातून बेपत्ता झाली आहे. या तिन्ही घटनांनी पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे.

दोन मैत्रिणी एकाच दिवशी गायब
शनिवारी (ता. ८ नोव्हेंबर) सकाळी शहरातील एका माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या दोन १४ वर्षीय मुली शाळेला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र, सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. नातेवाईकांनी शाळेत चौकशी केली असता दोघी शाळेत पोचल्याच नव्हत्या, हे समजले. तत्काळ गावभाग पोलिस ठाण्यात दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोघी शाळेच्या गणवेशात चांदणी चौक परिसरात चालत जाताना दिसल्या. त्यानंतर त्या रिक्षाने बसस्थानक परिसरात गेल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्या हालचालींचा काहीच मागमूस लागलेला नाही.
सहकारनगरातील आणखी एक विद्यार्थिनी बेपत्ता
दरम्यान, रविवारी सकाळी सहकारनगर येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी घराच्या मागील दुकानात जातो असे सांगून बाहेर पडली आणि परतलीच नाही. तिच्या आईने तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद कोळेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांचा शोधमोहीमेस प्रारंभ
तिन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि इतर गर्दीच्या भागात तपास मोहीम राबवली जात आहे.
पोलिसांचे आवाहन
पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या मुलींबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास कृपया तत्काळ गावभाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.”
या सलग तीन बेपत्ता मुलींच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली असून, मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत जागरूकतेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.
