Women’s Empowerment: राज्य सार्वजनिक विद्यापीठांतील महिला विद्यार्थीनींसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाला गती देण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. स्त्रीशक्ती ॲप नोंदणी, मतदान जनजागृती व महिला क्रीडा उपक्रमांवर भर.
मुंबई (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
महिला सशक्तीकरणाच्या (Women’s Empowerment) दिशेने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘स्वयंसिद्धा’ उपक्रमाला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी जास्तीत जास्त महिला विद्यार्थीनींना जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, तसेच ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर मोठ्या प्रमाणात नोंदणी व्हावी, असे स्पष्ट निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
राज्यपाल भवन ‘लोकभवन’ येथे डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसिद्धा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राम मूर्ती, सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे स्वयंसिद्धा उपक्रमाशी संबंधित प्रतिनिधी सहभागी झाले होते.

स्त्रीशक्ती ॲपवर नोंदणी वाढवण्यावर भर
डॉ. नारनवरे यांनी सांगितले की, राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी वेब पोर्टलवर नोंदणी केली असून, त्या सर्व महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवरही नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर महिलांशी संबंधित सर्व माहिती व उपक्रम उपलब्ध होतील.
State Governor’s Secretary Dr. Prashant Narnaware has directed to accelerate the ‘Swayamsiddha’ initiative being implemented for women students in state public universities. Emphasis has been laid on registration on the Stri Shakti app, voter awareness campaigns, and women-centric sports initiatives.
उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन
प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातील स्वयंसिद्धा महिला अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती विद्यापीठाच्या पोर्टलवर तसेच विद्यार्थिनींच्या वैयक्तिक स्वयंसिद्धा मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करावी, असे निर्देश देण्यात आले. महिलांना विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि नेतृत्व विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रवृत्त करावे, असेही त्यांनी नमूद केले.

मतदान जनजागृतीसाठी ‘स्वीप’ उपक्रम
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, स्वयंसिद्धा विद्यार्थीनींनी ‘स्वीप (SVEEP)’ उपक्रमांतर्गत महिलांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती करावी. शहरी व ग्रामीण भागात जाऊन महिलांना मतदानाचा हक्क, लोकशाहीतील सहभाग आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती द्यावी. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #WomenEmpowerment हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला क्रीडा व यशोगाथांनाही प्रोत्साहन
महिला व बालविकास विभागाच्या ‘आदिशक्ती’ उपक्रमामध्ये स्वयंसिद्धाचा सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगताना डॉ. नारनवरे यांनी ‘महा-देवा प्रोजेक्ट’साठी महिला फुटबॉल संघ तयार करण्यासाठी स्वयंसिद्धामार्फत आवाहन करण्याचे निर्देश दिले. तसेच स्वयंसिद्धा उपक्रमांतून घडलेल्या महिलांच्या यशोगाथा पोर्टलवर प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात आला.
सक्रिय विद्यापीठांचे रँकिंग जाहीर होणार
ज्या विद्यापीठांमध्ये स्वयंसिद्धा अंतर्गत अधिकाधिक उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत, अशा विद्यापीठांतील विद्यार्थिनींचे विशेष रँकिंग तयार केले जाईल, अशी घोषणाही डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी केली.
महिला सशक्तीकरणाला (Women’s Empowerment) नवे बळ देणारा ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि नेतृत्वक्षम बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, या उपक्रमात महिला विद्यार्थीनींचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
