अधिक तपास विटा (VITA) पोलीस करत आहेत
सांगली, (आयर्विन टाइम्स);
सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अनधिकृत दारु विक्रीवर कारवाईत एक मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने विना परवाना देशी व विदेशी दारु वाहतूक करणाऱ्या महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे (वय ४२, राहणार: वासुंबे रोड, विटा – VITA) ) याच्या विरोधात तात्काळ कारवाई करत एकूण २,२६,५४३ रुपये किमतीचा दारु आणि वाहतूक वाहनाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रकरणाचा तपशील
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे समाजविरोधी घटकांकडून अवैध कारवाया रोखण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला अवैध व बेकायदेशीर दारु विक्री, वाहतूक, तसेच साठ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखेने उपविभागीय पथकाच्या माध्यमातून तपास व कारवाईचे काम हाती घेतले आहे.
बातमीदारा कडून मिळालेली माहिती
दि. २६ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोहेकॉ हणमंत लोहार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, महेश ऊर्फ पिंटु उबाळे हा बिगरपरवाना विदेशी दारुचा साठा ओमनी गाडीतून विटा (VITA) -नेवरी मार्गे विक्रीसाठी घेऊन जात आहे.
कारवाईचा तपशील
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने विटा (VITA) -नेवरी मार्गावर नजर ठेवली. काही वेळातच पांढऱ्या रंगाची ओमनी गाडी त्या रस्त्यावरून येताना दिसली. गाडी थांबवून चालकाचे नाव विचारले असता, त्याने स्वतःचे नाव महेश ऊर्फ पिंटु वसंतराव उबाळे (वय ४२ वर्षे) असल्याचे सांगितले. त्यानंतर ओमनी गाडीची झडती घेतली असता, त्यात देशी दारु, विदेशी दारु व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळाले. जप्त केलेल्या दारुची किंमत ७६,५४३ रुपये असून, चार चाकी ओमनी गाडीसह एकूण २,२६,५४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
दारुबंदी अधिनियम अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ सुरज थोरात यांनी विटा पोलीस ठाण्यात केली आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा (VITA) पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत दारु विक्रीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. या घटनेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि कार्यकुशलता समाजात कौतुकाचा विषय ठरत आहे.