विटा पोलिसांची मोठी कारवाई

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याने धाडसी कारवाई करत कर्नाटकमधील घरफोडी प्रकरणातील तब्बल १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

चोरीची घटना कर्नाटकात

दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ते दि. २१ ऑगस्ट रोजी पहाटे २.५१ वाजेपर्यंत कर्नाटक राज्यातील चिक्कमंगरुळ जिल्ह्यातील निकसे येथे ही घरफोडी झाली होती. फिर्यादी शिवमुर्ती शेशाप्पा गोवडा (वय ५० वर्षे) यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरीस गेला होता. या प्रकरणी कोप्पा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सांगली

विटा पोलिसांना मिळाली पक्की माहिती

दि. २१ ऑगस्ट रोजी वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. विटा पोलीस हद्दीत भिवघाट- विजापूर रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (के ए ५३ ए बी ५४६६) संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. तात्काळ गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी वाहन अडवून आत असलेल्या तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

आरोपींची नावे

1. राजेंद्र शेर बम (वय ३०, रा. धनगेडी, जि. कैलाली, नेपाळ)
2. एकेंद्र कटक बडवाल (वय ३१, रा. धनगेडी, जि. कैलाली, नेपाळ)
3. करणसिंह बहादुर धामी (वय ३४, रा. धनगेडी, जि. कैलाली, नेपाळ)

हे तिन्ही आरोपी नेपाळमधील रहिवासी असून, ते चोरी करून कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात आले होते.

हेदेखील वाचा: Ichalkaranji crime news: पत्नीशी जवळीकतेच्या संशयातून 32 वर्षीय मित्राचा खून – इचलकरंजी हादरले

मुद्देमाल जप्त

गाडीची तपासणी करताना पोलिसांना डीकीमध्ये ठेवलेल्या पिशवीत मोठ्या प्रमाणात दागिने आढळले. पंचासमक्ष झालेल्या झडती व चौकशीत आरोपींनी चोरी केलेला ऐवज असल्याची कबुली दिली.

जप्त केलेल्या ऐवजामध्ये –

* सोन्याचे दागिने : विविध डिझाईनचे दागिने, मंगळसूत्रे, मण्यांच्या माळा – वजन १ किलो ८०२ ग्रॅम ३८० मिली, किंमत ₹१,४४,१९,०४०/-
* चांदीचे दागिने व पूजावस्तू : समई, आरत्या, मणी आदी – वजन १ किलो २०१ ग्रॅम ७९० मिली, किंमत ₹८४,१२५.३०/-
* वाहन : पांढरी स्विफ्ट डिझायर कार (के ए ५३ ए बी ५४६६), किंमत ₹५,००,०००/-

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत : ₹१,५०,०३,१६५.३०/-

पोलिसांची संयुक्त कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे (विटा पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक सतीश शिंदे (गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली) तसेच उपनिरीक्षक अभिजीत कणसे, सचिन माळी आणि इतर कर्मचारी—अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेबाघ, महादेव चव्हाण, अमोल नलवडे, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सागर कोकरे, गोरक्ष धुमाळ, सागर शिंदे, अभिजीत पाटील (सायबर सेल) यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

पुढील कार्यवाही

तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासासाठी कर्नाटक पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

👉 या कारवाईमुळे सांगली जिल्हा पोलीस दलाने आणखी एक मोठा गुन्हा उघडकीस आणत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *