आश्चर्यकारक बाहुली (Doll) कलेक्शन पाहायला मिळतात
मुलांना बाहुल्यांशी खेळणे आवडतेच. ते घरात आपल्याला आवडणाऱ्या बाहुल्यांचे कलेक्शनही तयार करतात. जगभरात अशा अनेक अनोख्या आणि आकर्षक संग्रहालयांमध्ये विविध देशांतील मोहक बाहुल्यांचे कलेक्शन पाहायला मिळते.
म्यूजी डी ला पौपी, फ्रान्स
फ्रान्समधील या बाहुली (Doll) संग्रहालयात इ.स. 1800 ते 2000 पर्यंतच्या तब्बल 5,000 दुर्मिळ फ्रेंच बाहुल्यांचा संग्रह आहे. याची खास गोष्ट म्हणजे येथे या बाहुल्यांसोबत त्यांच्या फर्निचर, अॅक्सेसरीज आणि खेळणीही ठेवल्या आहेत. या संग्रहालयात वर्षातून दोन-तीन वेळा या बाहुल्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवले जाते. याठिकाणी एक सुंदर गिफ्ट शॉप देखील आहे, जिथे मुलांना आवडणाऱ्या बाहुल्या खरेदी करता येतात.
याकोहामा डॉल म्यूजियम, जपान
जगातील अनोख्या संग्रहालयांपैकी एक असलेल्या याकोहामा डॉल (Doll) म्यूजियममध्ये 140 देशांतील दहा हजारांहून अधिक बाहुल्या संग्रहित केल्या आहेत. वेगवेगळ्या देशांमधील बाहुल्यांचे जतन करणे आणि त्यांची देखभाल करणे हे आव्हानात्मक कार्य आहे. येथे प्राचीन काळातील एंटीक बाहुल्या आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधील वेषभूषेत साजर्या केलेल्या बाहुल्या पाहताना थक्क व्हायला होते. या संग्रहालयात जपानी लोककलेतील विशेष बाहुल्या आणि मंदिरांमध्ये मिळणाऱ्या खास बाहुल्या पाहायला मिळतात.
वेनहॅम म्यूजियम, बोस्टन, अमेरिका
या संग्रहालयात वेगवेगळ्या पिढ्यांच्या परंपरा, पोशाख आणि मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या जगभरातील बाहुल्यांचे कलेक्शन आहे. येथे स्थानिकच नव्हे तर परदेशी संस्कृती आणि रीतीरिवाजांची माहितीही मिळते. इ.स.पूर्व 1500 पासून 20व्या शतकापर्यंतच्या एंटीक बाहुल्या येथे पाहता येतात. पोर्सलीनच्या युरोपियन बाहुल्या, आंतरराष्ट्रीय प्रवासी बाहुल्या, अमेरिकन क्लोप बाहुल्यांचे विविध प्रकार येथे आहेत. 1900 ते 1902 दरम्यान संपूर्ण जगाचा प्रवास केलेली ‘कोलंबिया’ नावाची ऐतिहासिक बाहुली (Doll) ही या संग्रहालयात पाहायला मिळते.
कोबर्ग पपेन म्यूजियम, जर्मनी
जर्मनीतील कोबर्ग शहरात मोठ्या प्रमाणावर बाहुल्यांचे उत्पादन होते. येथे जर्मनीच्या उत्कृष्ट क्लासिक बाहुल्या पाहायला मिळतात. सुमारे 900 बाहुल्यांच्या या संग्रहात अनेक दुर्मिळ फ्रेंच बाहुल्याही आहेत. येथे बाहुल्यांना त्यांच्या फर्निचर, पोशाख आणि अॅक्सेसरीजसह साजरे करून प्रदर्शित केले आहे.
हे देखील वाचा: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड: ‘या’ महिलेचे केस आहेत साडेआठ फूट लांब
शंकर इंटरनॅशनल डॉल म्यूजियम, भारत
जगातील अनेक प्रसिद्ध बाहुली (Doll) संग्रहालयांच्या माहितीनंतर आता भारतातील शंकर इंटरनॅशनल डॉल म्यूजियमची माहिती पाहू. प्रसिद्ध व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई यांनी 1965 मध्ये या संग्रहालयाची स्थापना केली. येथे जगभरातील कोणत्याही अन्य संग्रहालयापेक्षा अधिक कॉस्ट्यूम बाहुल्या आहेत. या संग्रहालयाच्या स्थापनेची कथा खूपच मनोरंजक आहे. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे एकदा हंगेरीच्या राजदूतांनी त्यांना एक बाहुली (Doll) भेट दिली होती. ही बाहुली (Doll) एका मुलांच्या स्पर्धेतील विजेत्यासाठी होती; पण शंकर यांना ती इतकी आवडली की त्यांनी ती स्वतःकडे ठेवली.
त्यानंतर शंकर यांना बाहुल्यांचा मोठा लळा लागला, आणि त्यांनी विविध देशांतून बाहुल्या गोळा करण्यास सुरुवात केली. या संग्रहालयात 85 देशांतील 6,500 हून अधिक बाहुल्या संग्रहित केल्या आहेत.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली