Shri Yallamma Devi Temple: मार्गशीर्ष अमावस्या व शुक्रवारच्या योगावर जत येथील जागृत देवी श्री यल्लमादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. गंध, नवसपूर्ती, पुरणपोळीचा नैवेद्य व यात्रेतील घडामोडींचा सविस्तर आढावा.
जत | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या जागृत देवी श्री यल्लमादेवीची यात्रा नुकतीच भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली. मार्गशीर्ष अमावस्या, शुक्रवार आणि देवीचा वार या शुभ योगामुळे आज सकाळपासूनच श्री यल्लमादेवीच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला होता. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही लाखो भाविक जत नगरीत दाखल झाले होते.
यात्रेतील किच कार्यक्रमापूर्वी देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी मानकरी कोळी समाजाच्या महिलांकडे असलेल्या देवीच्या अंबिलाच्या घागरीची विधिवत पूजा केली. त्यानंतर देवळात देवीची आरती करून भक्तांची गाऱ्हाणी देवीसमोर मांडण्यात आली. किच कार्यक्रमासाठी देवीचा दरवाजा बंद करून पुजारी कीचकडे रवाना झाले. किच कार्यक्रमानंतर शुक्रवारी रात्री बारा वाजल्यानंतर देवीचा दरवाजा उघडण्यात आला. पहाटे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक, पूजा व आरती केली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.

नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी
मार्गशीर्ष अमावस्या, शुक्रवार व देवीचा वार असल्याने आरोग्यविषयक अडचणी दूर व्हाव्यात, देवीची कृपादृष्टी सदैव राहावी यासाठी नवस केलेल्या हजारो भाविकांनी आज आपले नवस फेडले. मंदिरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर पुरुष व महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम स्नानकुंडात भाविकांनी स्नान केले. त्यानंतर ओल्या अंगाने मंदिर परिसरातील देवदासी व जोगतींकडून सर्वांगाला गंध लावून, कमरेला लिंबाचे डहाळे बांधून, तोंडात लिंबाची पाने धरून
“उदो गं आई उदो… यल्लू आईचा उदो…”
असा जयघोष करीत मंदिर प्रदक्षिणा घालून देवीचे दर्शन घेतले.
पुरणपोळीचा नैवेद्य
आज लाखो भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी यात्रास्थळीच तीन दगडांची चूल मांडून त्यावर पुरणपोळी बनवून देवीला नैवेद्य दाखवला. यामुळे संपूर्ण यात्रा परिसरात भक्तिभावाचे व प्रसन्नतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
यात्रेतील गर्दी व मनोरंजन
यात्रा संपल्यानंतरही आज पुन्हा मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याचे चित्र दिसत होते. पंढरपूर येथील प्रसिद्ध मेवा-मिठाई व्यावसायिक खंडागळे बंधू यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यात्रेतील सर्वच गल्ल्या यात्रेकरूंनी फुलून गेल्या होत्या. आकाशी पाळणे, मौत का कुवा यांसह लहान-मोठी दोन डझनहून अधिक पाळणे आणि विविध मनोरंजनाची साधने आल्याने यात्रेकरूंनी मनमुराद आनंद लुटला.
नियोजनावर नाराजी, गैरप्रकारांवर टीका
मात्र यंदा श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान व यात्रा कमिटीने केलेल्या नव्या नियोजनामुळे अनेक ठिकाणी यात्रेकरू गोंधळून गेल्याचे दिसून आले. प्रतिष्ठानच्या मालकीच्या, वर्षानुवर्षे यात्रेसाठी राखीव असलेल्या जागेवर काही धनदांडग्यांनी बेकायदेशीर प्लॉटिंग केल्याने प्रतिष्ठानने सुरक्षा कारणास्तव बिलूर रस्त्यालगत सात फूट उंच आरसीसी भिंत उभारली आहे. त्यामुळे यंदा यात्रेचे स्वरूप बदलल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला.
तसेच आजही यात्रेसाठी येणाऱ्या वाहनांना शहराबाहेरच अडवून **हप्तेखोर व बेकायदेशीर ‘पे पार्किंग’**च्या नावाखाली दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात आला.

यात्रेकरूंच्या अपेक्षा
श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील यात्रांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करावे, भाविकांसाठी सोयी-सुविधा वाढवाव्यात, अशी अपेक्षा यात्रेकरूंनी व्यक्त केली.
यात्रेदरम्यान प्रतिष्ठानचे सेवेकरी पापा सनदी, मोहन माने-पाटील, संग्राम राजेशिर्के, कैलास गायकवाड, गणपतराव कोडग, मोहन शिंदे, चंद्रकांत कोळी, मोहन चव्हाण, बंडू दुधाळ, अनिल शिंदे, दिनकर पतंगे, अरुण शिंदे, अमर जाधव आदींनी यात्रेकरूंना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी मोलाचे सहकार्य केले.
On the occasion of Margashirsha Amavasya, a massive crowd of devotees gathered at Shri Yallamma Devi Temple in Jat to seek blessings. Lakhs of devotees from Jat region as well as from Maharashtra and Karnataka visited the temple to fulfill their vows and offer prayers to the revered and wish-fulfilling deity.
After the completion of traditional rituals such as the Kich ceremony, the temple doors were opened late at night, followed by early morning abhishek, puja, and aarti, after which darshan was made available to all devotees. Many devotees observed rituals including holy bath, application of sacred turmeric paste (gandh), lemon garlands, and chanting devotional slogans while circumambulating the temple.
A large number of devotees offered Puran Poli as prasad, with many preparing it on traditional stone stoves within the fair premises. The fair area remained crowded with pilgrims enjoying various rides, food stalls, and entertainment activities.
However, due to changes in the fair layout and security arrangements, some devotees faced inconvenience. There were also complaints regarding illegal parking charges and harassment of vehicle owners.
Devotees expressed hope that the Shri Yallamma Devi Trust, Jat, will ensure better planning and improved facilities for pilgrims in future festivals.
