📰 कोल्हापूरच्या गिजवणे गावात मालमत्तेच्या वादातून डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांवर दुचाकी घालून हल्ला केला आणि चावा घेऊन तर्जनी बोटाचा पुढील भाग तोडला. जखमी गणपतराव हाळवणकर रुग्णालयात दाखल; डॉ. शुभांगी निकमविरुद्ध गुन्हा दाखल.
कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो याचे धक्कादायक उदाहरण गिजवणे गावात समोर आले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने मालमत्तेच्या वाटणीवरून चाललेल्या वादाचा राग मनात धरत आपल्या वडिलांवरच हल्ला केला. यामध्ये ७८ वर्षीय गणपतराव विष्णू हाळवणकर यांच्या उजव्या हाताची तर्जनी (पहिले बोट) तुटून गंभीर जखम झाली आहे.
या प्रकरणी मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (वय ४३, रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज) हिच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक वादाचा राग राखून हल्ला
गणपतराव हाळवणकर व त्यांच्या दोन मुली — डॉ. शुभांगी व ज्योती — यांच्या दरम्यान मालमत्तेच्या वाटणीवरून काही काळापासून वाद सुरू होता. दरम्यान, ११ आणि १४ नोव्हेंबर रोजी डॉ. शुभांगीने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही गणपतरावांनी पोलिसांत नोंदवली होती.
रविवारी सायंकाळी हल्ला — दुचाकी अंगावर घातली
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गणपतराव फिरण्यासाठी बाहेर पडले असताना पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दिशेने डॉ. शुभांगीने आपल्या ताब्यातील दुचाकी वेगात आणून धडक दिली. धक्क्याने ते रस्त्यावर कोसळले.
यानंतर संतापलेल्या शुभांगीने वडिलांना शिवीगाळ करत,
“माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतोस काय, आता तुला जिवंत सोडणार नाही!”
असे म्हणत त्यांच्यावर लाथांनी व हातांनी हल्ला चढवला.
चावा घेऊन बोटाचे पुढील अंग तुटले
वडिलांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता शुभांगीने त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला जोराचा चावा घेतला. चावा इतका तीव्र होता की बोटाचा पुढील भाग तुटून पडला आणि जोरदार रक्तस्त्राव सुरू झाला.
रुग्णालयात उपचार; पोलिसांत गुन्हा दाखल
जखमी गणपतराव यांनी तातडीने मुलगा उदय याला फोन करून माहिती दिली. घटनास्थळी धाव घेत उदयने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.
उदय हाळवणकर यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा डॉ. शुभांगीविरुद्ध जाणूनबुजून दुखापत, जीव घेण्याचा प्रयत्न, आणि शिवीगाळ–मारहाण या गंभीर गुन्ह्यांखाली केस दाखल करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
