जत येथे केली उत्तरीय तपासणी
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील उमदी येथे पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने सासरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मृत पती हा कर्नाटक राज्यातील असल्याचे समोर आले आहे. अनिल बडीगेर (रा. हडलसंग ता. इंडी जिल्हा विजापूर, रा. कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. जत येथे उत्तरीय तपासणी केली, मात्र रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत बड़ीगेर हा पत्नीला मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळून तीन महिन्यापूर्वी पत्नी माहेरी आली होती. रविवारी (दि. १८) पुन्हा तो सासरी आला आणि पत्नीला ‘घरी चल’ असे म्हणत वादावादी करु लागला. त्यानंतर त्याने घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत दुपारीच बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले. लोकांनी आरडाओरडा केला. मात्र त्यांचा तिथेच होरपळून मृत्यू झाला.
जत तालुक्यातील वाळेखिंडीतून चोरलेल्या ट्रॅक्टरप्रकरणी दोघांना अटक
आयर्विन टाइम्स /जत
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे तर एकजण अद्याप फरार आहे. वाळेखिंडी येथील टोणेवस्ती वरून मंगल हिप्परकर यांच्या घराच्या पाठीमागे उभा लावलेला साडेसहा लाख किमतीचा महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर व नांगर चोरीस गेला होता. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरीच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असताना एका गोपनीय बातमीदाराकडून जत व शेगाव राष्ट्रीय महामार्गालगत एक ट्रॅक्टर व मोटरसायकलीसह काहीजण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलीस पोहचले तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील घेरडी येथील अनिल ईश्वर माने (वय २८) व अजित मायाप्पा घुटुकडे (वय २२) यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. संशयिताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी राजू कृष्णा करांडे यांच्या मदतीने सदरचा ट्रॅक्टर चोरून आणल्याचे सांगितले.
सांगलीत युवकाच्या गळ्यातील चेन हिसकावली: तिघांना अटक : संजयनगर पोलिसांची कारवाई
आयर्विन टाइम्स / सांगली
रस्त्यावर मित्रासमवेत गप्पा मारत थांबलेल्या एका युवकाच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तीन अनोळखी युवकांनी हिसकावून पलायन केले. ही घटना दि. १६ रोजी रात्री ११ च्या सुमारास सांगली शहरातील पंचशीलनगर परिसरात घडली. दरम्यान सारंग दिलीप वारे (वय १९), दिपक दगडू सकट ( वय १९), प्रतिक मनोज कांबळे (वय १९, सर्व रा. चिंतामणीनगर झोपडपट्टी, सांगली) यांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात रोहन महेश दाभोळे (रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, साखर कारखान्यासमोर सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पंचशीलनगर येथील दुर्गामाता मंदिरासमोर रोहन दाभोळे हा मित्रासमवेत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी संशियतांनी फिर्यादी रोहन याच्या गळ्यातील चेन हिसका मारुन तोडली आणि तेथून पलायन केले होते.