shocking: जत तालुक्यातील सनमडीत विजेचा धक्का लागून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील सनमडी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. गणेश गोपाळ केंगार (वय १६) असे मृत मुलाचे नाव असून रविवारी (ता. २३) सकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. शिक्षणासाठी चारच दिवसांपूर्वी तो मावशीकडे राहण्यासाठी आला होता. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गणेश केंगार याचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील जुजारपूर आहे. तो येथे एका चारच दिवसांपूर्वी सनमडी येथे मावशीकडे राहण्यासाठी आला होता. सोमवारी सकाळी तो विहिरीवरची पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला होता. यावेळी पेटीत विद्युत पुरवठा उतरला होता. त्याचा हात पेटीला लागताच त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची रविवारी दुपारी एकच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे विवाहितेची आत्महत्या

जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे चारित्र्याच्या संशयावरून पती, सासूसह चौघांकडून मानसिक व मारहाण करून त्रास दिल्याच्या कारणांतून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सरस्वती काशिलिंग लवटे (वय ३०, सिद्धनाथ, ता. जत) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) घडली.

याबाबत सविता अमोघसिद्ध सरगर ( वय ४०, कळकवटगी, ता. उटगी, जि. विजयपूर) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संशयित काशिलिंग महादेव लवटे, सासू विमल महादेव लवटे, रामचंद्र लवटे (सर्व सिद्धनाथ, ता. जत) व शैला गजानन लोखंडे (मल्लाळ, ता. जत) अशा चौघावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नव्हती. आई सविता सरगर यांनी जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौघावर गुन्हा दाखल केला आहे.

जत-विजयकुमार चिप्पलकट्टी

जतचे उद्योजक विजयकुमार चिप्पलकट्टी यांचे आज हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

जत तालुक्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविणारे सुप्रसिद्ध उद्योजक, मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, सांगली जिल्ह्याच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांचे आज सोमवारी हृदय विकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.

जत तालुक्यातील अंकलगी हे छोट्यासे खेडेगाव. ही त्यांची जन्मभूमी. सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. श्रीकांत चिपलकट्टी हे त्यांचे वडील. अंकलगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कर्नाटक राज्यात पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण दरबार हायस्कूल विजापूर येथे तर रायचूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदविका घेतली.

सरकारी नोकरी हे कधीच त्यांचे ध्येय नव्हते. अनुभवासाठी एका खासगी कंपनीत नोकरीला सुरूवात केली. इलेक्ट्रीक क्षेत्रातील पुरेसा अनुभव घेऊन कुपवाड एमआयडीसी सांगली येथे १९९५ मध्ये मॅग्नेविन एनर्जी या कंपनीची स्थापना करण्यात आली. ही कंपनी संरक्षण, विद्युत मंडळ इत्यादींना लागणारे विविध प्रकारचे कॅपेसिटर तयार करतात. मॅग्नेविन एनर्जीचे कॅपेसिटर आज जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केले जातात. देशातील जवळजवळ सर्व राज्यांत पाठविले जातात.

हे देखील वाचा: Good News1: उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसी होणार; आ. गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली जागेची पाहणी  

विजयकुमार चिपलकट्टी हे मल्लिकार्जुन विद्यावर्धक संस्था, अंकलगीचे अध्यक्षही होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकलगी ते करजगी रस्ता स्वखर्चाने केला. तर ग्रामदेवतेचे मंदिर स्वखर्चाने उभारले. अंकलगी पाणी योजनेच्या मंजूरीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सांगली जिल्हा सहकार बोर्ड व रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा आदर्श उद्योगरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते मा श्री सयाजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्यांच्या अचानक जाण्याने जत तालुक्याचे सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जत-तम्मनगौडा रवीपाटील

आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार: तम्मनगौडा रवीपाटील

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या घडामोडी बाजूला ठेवत जतचे माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी पुन्हा भाजपमध्ये सक्रिय व्हावे यासाठी आपण विलासराव जगताप यांची मनधरणी करणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून विलासराव जगताप यांच्या घरवापसीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घालणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी विधानसभा निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीत लढणारच असल्याचे सांगत तम्मनगौडा रवीपाटील यांनी आ. गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा मतदारसंघात लुडबूड करू नये, असा टोला लगावत पक्षश्रेष्ठींकडे आ. पडळकर यांची तक्रार केल्याचे नाही.

माजी खासदार धनंजय महाडिक व अतुल भोसले यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची बैठक सांगलीत झाली. या बैठकीत सांगली लोकसभा निवडणुकीत जतमधून भाजपला मताधिक्य दिल्याबद्दल आपला विशेष सत्कार केल्याचे सांगून रवीपाटील म्हणाले, या बैठकीत आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होणार यात शंका नाही असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !