Sangli Political News: दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांमध्ये उत्साह
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
विधानसभेच्या राजकीय रणधुमाळीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची तयारी दिसून येत आहे. सांगलीत (Sangli) देखील याची उत्सुकता आहे. विधानसभेतील यशामुळे महायुती उत्साहात असून, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी मिनी मंत्रालयाच्या लढतीसाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, व ठाकरे गटाला संघर्ष करावा लागणार आहे.
२०१७ ची जिल्हा परिषद निवडणूक: भाजपाचा ऐतिहासिक विजय
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने सांगली (Sangli) जिल्ह्यात २६ जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र, मार्च २०२२ पासून जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या कार्यकाळाची मुदत संपली असून, प्रशासकांकडे सगळी जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता निवडणुकांचे ढोल वाजण्याची शक्यता आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील तालुकानिहाय राजकीय स्थिती
१. मिरज: मिरजमध्ये भाजपची पकड मजबूत असून, मागील निवडणुकीत सांगली (Sangli)जिल्हा परिषदेच्या ११ गटांपैकी ७ गटांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला तीन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद गट या निवडणुकीत पिछाडीवर असल्याने त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील.
२. पलूस: पलूसमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये चुरस अपेक्षित आहे. विधानसभेतील माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसला ताकद मिळू शकते.गेल्या निवडणुकीत भाजपाचे तीन, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक सदस्य होता.
३. तासगाव: सांगली (Sangli) जिल्ह्यातील हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादी शरद गटाचे वर्चस्व आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे भाजपापुढे मोठे आव्हान आहे. या भागात राष्ट्रवादीचे चार आणि भाजपाचा एक, भाजप पुरस्कृत एक सदस्य होता.
४. कडेगाव: कडेगाव तालुक्यात काँग्रेस व भाजपचा जोर आहे. मागील निवडणुकीत भाजपने ३ जागांवर विजय मिळवला होता, काँग्रेसचा एक सदस्य निवडून आला होता. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम विजयी झाले आहेत. ते आपला गड शाबूत ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील. त्यामुळे या निवडणुकीतही चुरस पाहायला मिळेल.
५. वाळवा: वाळवा तालुका जयंत पाटील यांचा गड मानला जातो. तसे पाहायला गेले तर श्री. पाटील यांचे सांगली (Sangli) जिल्ह्यात वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्या वाळवा तालुक्यात झेडपीचे पाच सदस्य त्यांनी निवडून आणले होते. मात्र विधानसभेतील मताधिक्यात घट झाल्यामुळे राष्ट्रवादीसमोर भाजपाचे निशिकांत पाटील मोठे आव्हान निर्माण करू शकतात.
६. शिराळा: शिराळा तालुक्यात काँग्रेस व भाजप यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. विधानसभेत सत्यजित देशमुख यांच्या विजयामुळे भाजपाला बळ मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत शिराळा तालुक्यात दोन काँग्रेसचे आणि दोन भाजपाचे झेडपी सदस्य होते. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि भाजपाने वेळोवेळी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या तालुक्यातून भाजपाचे सत्यजित देशमुख मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे तीन पक्षांच्या नेत्यांची जि. प.च्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.
७. कवठेमहांकाळ: कवठेमहांकाळमध्ये स्थानिक गट महत्त्वाचे आहेत. लोकसभा व विधानसभेतील यशानंतर झेडपीच्या निवडणुकीतही या गटांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि घोरपडे गटाचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य होते. लोकसभेला खासदार विशाल पाटील आणि विधानसभेला आमदार रोहित पाटील यांना तालुक्यातील लोकांनी साथ दिली. त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीत आबा गट, घोरपडे गट आणि भाजपाला अस्तित्व दाखवून देण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
८. आटपाडी आणि खानापूर : आटपाडी तालुक्यात भाजप व शिंदे गट आघाडीवर आहेत. विधानसभेतील सुहास बाबर यांच्या विजयामुळे येथे महायुतीला मजबूत स्थिती आहे. तालुक्यात गेल्या निवडणुकीत तीन जागांवर भाजपाचे कमळ फुलले होते. या तालुक्यात भाजपाने बस्तान बसविले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सुहास बाबर यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना या तालुक्यात आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
९. जत: सांगली (Sangli) जिल्ह्यातील हा शेवटचा तालुका आहे. जत तालुक्यात भाजपने मागील निवडणुकीत सहा जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसचे तीन सदस्य होते. तालुक्यात भाजप आणि काँग्रेसची ताकद आहे. तुलनेत इतर पक्ष कमकुवत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जागा हिरावून घेऊन भाजपचे गोपीचंद पडळकर निवडून आले आहेत. साहजिकच भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा बळ मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागणार आहे.
महायुतीसाठी संधी, महाविकास आघाडीसाठी आव्हान
विधानसभेतील यशामुळे भाजप व शिवसेना महायुतीला अनुकूल वातावरण आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्नांची गरज आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिनी मंत्रालयाच्या निवडणुका यावेळी अधिक चुरशीच्या व रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.