सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील चार सराईत आरोपींना अटक करून तब्बल १३ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत सुमारे १० लाख ३१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इस्लामपूर अजिंक्यनगर येथील कुसुम सितारा वायदंडे यांनी २४ मे रोजी चोरीची फिर्याद दिली आहे.
आरोपींची माहिती
अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१) आकाश कल्लाप्पा काळे (२७, रा. एकतानगर सातारा रोड जत, जि. सांगली)
२) सचिन अभिमान काळे (३२, रा. यल्लमवाडी मोहोळ, जि. सोलापूर)
३) दत्ता संपत चव्हाण (५४, रा. एकतानगर सातारा रोड जत, जि. सांगली)
४) गोविंद राजु काळे (२८, रा. उमराणी रोड जत, जि. सांगली)
हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सांगली, सोलापूर, कर्नाटक व तेलंगणा या ठिकाणीही घरफोडी, दरोडे व मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये यांचे नाव आहे.

उघडकीस आलेले गुन्हे
सदर आरोपींनी इस्लामपुर, आटपाडी, विटा, कडेगाव, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण १३ गुन्ह्यांचा छडा उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेदेखील वाचा: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : भारतातील विकास, आव्हाने आणि संधी
जप्त मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला :
* ५ लाख रुपये किंमतीचे हुंडाई कंपनीचे आय-२० चारचाकी वाहन
* ५.१८ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (बोरमाळ, अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, वजरटीक इ.)
* १३ हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने (पैंजण, करदोडे, ब्रासलेट इ.)
* घरफोडीसाठी वापरण्यात आलेली सॅक, लोखंडी पोपटपाना, स्क्रूड्रायव्हर, स्टील रॉड
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १०,३१,६३०/- रुपये एवढी आहे.

कारवाईचा तपशील
२४ मे ते २७ मे २०२५ दरम्यान इस्लामपुर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर, सिकंदर वर्धन व पथकाने तपास सुरू केला. गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे २९ सप्टेंबर रोजी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलिस निरीक्षक सतिश शिंदे(स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा) यांच्या नेतृत्वाखाली जयदिप कळेकर, सिकंदर वर्धन, तसेच पोलीस कर्मचारी प्रमोद साखरपे, संजय पाटील, हणमंत लोहार, सुरज थोरात, शिवाजी शिदे, अभिजीत ठाणेकर, बसवराज शिरगुप्पी आदींनी सहभाग घेतला.
पुढील तपास
जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी इस्लामपुर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, सदर प्रकरणाचा अधिक तपास इस्लामपुर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
👉 सांगली जिल्ह्यातील या कारवाईमुळे घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
