सांगली, मिरज येथून तीन मोटारसायकली पळवल्या
सांगली/ आयर्विन टाइम्स
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत १,८०,००० रुपये इतकी आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असलेल्या या चोरट्यांनी शहरातील विविध भागातून गाड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्याची हकीगत
दि. १७.१०.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या टीमने मिरज उपविभागात गस्त घालत असताना पोहवा दरिबा बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गौरव सुंदर भोले (वय २१, पत्ता – माजी सैनिक वसाहत, मिरज) याने चोरी केलेली मोपेड वाहने त्याच्या घरासमोर लपवून ठेवली आहेत.
पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून गौरव भोले याला अटक केली. त्याच्या घरासमोरील दोन मोपेड वाहने जप्त करण्यात आली. त्याने या गाड्या ऑक्सीजन पार्क, मिरज आणि निपाणीकर कॉलनी, मिरज येथून चोरी केल्याची कबुली दिली.
दुसऱ्या कारवाईत, पोलीस पथकाला माहिती मिळाली की, सुशांत सुनिल चंदनशिवे (वय २६, पत्ता – म्हाडा कॉलनी, चिंतामणीनगर, सांगली) हा चोरीची मोटारसायकल घेवून सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातून जाणार आहे. पोलीस पथकाने सापळा रचून त्याला हिरो पॅशन मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, ही मोटारसायकल सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलजवळून चोरी केली होती.
जप्त मुद्देमाल
१) एक हिरो कंपनीची मोटारसायकल – किंमत ६०,०००/- रुपये
२) पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा मोपेड – किंमत ६०,०००/- रुपये
३) निळ्या रंगाची अॅक्टीवा मोपेड – किंमत ६०,०००/- रुपये
जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत १,८०,०००/- रुपये इतकी आहे.
कारवाई करणारे अधिकारी
या महत्त्वपूर्ण कारवाईत सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, सतिश माने, दरिबा बंडगर, नागेश खरात आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.
सध्या पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे व विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहेत.