सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची मोठी कारवाई
सांगली, (आयर्विन टाइम्स):
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात अवैध गुटखा व पानमसाला विक्रीविरोधात कठोर पावले उचलत, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ९,७१,४९२ रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक ५२८/२०२४ अन्वये नोंदवलेल्या या प्रकरणात, अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या विविध कलमांतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांचा आधार घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जुना बुधगाव रोड येथील नवीन आरटीओ कार्यालयाजवळ रात्री १२ वाजता करण्यात आली.
घटनाक्रम
माहितीनुसार, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या आदेशानुसार पोउपनि महादेव पोवार आणि त्यांच्या टीमने सांगलीत गस्त घालत असताना, पोहेकॉ संदीप पाटील यांना एक पांढऱ्या रंगाचे वाहन (CHEVROLET SAIL मॉडेल) गुटखा वाहतूक करण्याच्या उद्देशाने जुना बुधगाव रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली.
छापेमारीत जप्त माल:
1. विमल गुटखा – ५२ पाकिटे, किंमत: २,००,००० रुपये
2. केसरयुक्त विमल पानमसाला – २२ पाकिटे, किंमत: ३०,४९२ रुपये
3. पवन बाबु पानमसाला – ५० पाकिटे, किंमत: ५,००० रुपये
4. आर.एम.डी पानमसाला – ३५ पाकिटे, किंमत: ३५,००० रुपये
5. तंबाखूचे पाकिटे – किंमत: १,००० रुपये
6. CHEVROLET SAIL वाहन – किंमत: ७,००,००० रुपये
जप्त मालाची एकूण किंमत:९,७१,४९२ रुपये
सदर इसमाने त्याचे नाव सचिन हणमंत शेलार (वय ४२ वर्षे) असे सांगितले असून, तो सांगलीतील वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रोड येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी व पथक
पोलीस अधीक्षक संजय घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि महादेव पोवार, पोहेकॉ संदीप पाटील, रफीक मुलाणी, विनायक शिंदे, संतोष गळवे आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले होते.
सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असून, sangli त गुटखा आणि पानमसाल्यासारख्या अवैध धंद्यावर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.