सांगली LCB ची कवठेमहांकाळ परिसरात कारवाई
सांगली, (आयर्विन टाइम्स):
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू साठ्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत कवठेमहांकाळ परिसरातून सुमारे १२ लाख १२ हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याची हकिकत
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू झालेली असताना, पोलिसांना अवैध तंबाखू साठ्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी विशेष पथक तयार केले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने कारवाई केली.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पोलीस शिपाई प्रमोद साखरपे यांना माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (क्र. MH-01-AM-4537) अवैध सुगंधी तंबाखू वाहतूक करत आहे. कोकळे गावाच्या रांजणी रस्त्यावर वॉच ठेवून इनोव्हा कारला थांबवण्यात आले. चालक ललित सुमेरमल कच्छिया (वय ५७, रा. बोपेगाव, ता. वाई, जि. सातारा) याच्या गाडीतून शासनाने निर्बंध घातलेला बिमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधी तंबाखू मिळून आला.
जप्त मुद्देमाल
1. बिमल पानमसाला केसरयुक्त लाल रंगाचे कव्हर – ८० बॅगा, किंमत: ३,४८,४८०.
2. बिमल पानमसाला केसरयुक्त निळ्या रंगाचे कव्हर – १६ बॅगा, किंमत: ९९,८४०.
3. व्ही-१ टोबॅको जर्दा हिरवा कव्हर – १० बॅगा, किंमत: ३८,७२०.
4. व्ही-१ टोबॅको जर्दा पिवळा कव्हर – ४ बॅगा, किंमत: २४,९६०.
5. एक चारचाकी इनोव्हा वाहन – किंमत: ७,००,०००.
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – १२,१२,०००.
पुढील तपास
सदर मुद्देमाल आणि आरोपी ललित कच्छिया याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९, तसेच बी. एन. एस. कलम २२३, २७४, १२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी जनतेला अवैध गुटखा आणि तंबाखू उत्पादनांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, अशी कोणतीही माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.