सांगली जिल्ह्यातील ५३ सायलेन्सरवर बुलडोझर
सांगली,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) :
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता २५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाल्यापासून १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सांगली जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण शाखांनी नाकाबंदी व पेट्रोलिंग दरम्यान नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
जिल्ह्यात विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण ९,७४८ वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. या कारवाईमध्ये ट्रिपल सीटने प्रवास करणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, सिग्नलचे नियम न पाळणे, रहदारीस अडथळा आणणारे पार्किंग, पोलीसांचे आदेश व इशारे न पाळणे यासारख्या विविध नियमांच्या उल्लंघनाच्या केसेसचा समावेश आहे. या कारवाईतून एकूण ८२,२४,६००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,४३३ वाहनचालकांकडून ९,१२,९००/- रुपये दंड आकारण्यात आला असून १३४ केसेस न्यायालयात दाखल केल्या आहेत.
याशिवाय, परमिटचे उल्लंघन व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४१ रिक्षा व जीप वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच सायलेन्सर मॉडिफाय केलेल्या ५३ वाहनांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी जप्त केलेल्या ५३ सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे, जेणेकरून आवाज प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल.
मद्यपान करून वाहन चालवण्याच्या ४९ केसेस दाखल करण्यात आल्या असून संबंधित तळीराम वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे (मिरज), सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश यादव (तासगाव), व पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी (विटा) यांनी केली आहे.
आचारसंहितेच्या उर्वरित काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.