सांगली गुन्हे अन्वेषण विभागाला पाचव्या दिवशी यश
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्ह्यातील घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा अनैतिक संबंधाच्या कारणातून खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या प्रकरणातील दोन संशयितांना आज अटक केली. विशाल बाळासो मदने (वय २३) व सचिन शिवाजी थोरात (वय २५, दोघे रा. घानवड) अशी संशयितांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
घटना कशी घडली?
गुरुवारी (ता. ५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बापूराव चव्हाण गार्डी-नेवरी रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे दुचाकीने जात असताना हल्लेखोरांनी गार्डी हद्दीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पाचव्या दिवशी मिळाले यश
घटनेच्या तपासासाठी पाच पोलिस पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. चार दिवसांपासून सुरू असलेल्या तपासाला अखेर यश आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, मुख्य संशयित विशाल मदने व त्याचा साथीदार सचिन थोरात मिरज-पंढरपूर रोडवरील सिद्धेवाडी पुलाजवळ येणार आहेत.
सापळा रचून अटक
सिद्धेवाडी पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच संशयित तेथे दाखल झाले. पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी दरम्यान, विशाल मदने याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून बापूराव चव्हाण यांचा खून केल्याची कबुली दिली.
पोलिसांचा तपास वेगवान
खुनाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे. दोघा संशयितांना अटक करून पुढील कारवाईसाठी विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, न्याय मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी त्वरित तपास पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांचे कौतुक
पाच दिवसांत गुन्ह्याची उकल केल्याबद्दल सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलिस सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार व प्रमोद साखरपे यांच्या मेहनतीने गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू
दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेल्या या खुनाने गावात तणावाचे वातावरण असून, पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.