सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना
आयर्विन टाइम्स / सांगली
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, ता. मिरज) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. याबाबत संबंधित विद्यार्थिनीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली असून, शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषदेच्या एका शाळेत भरत कांबळे शिकवत आहे. यावेळी चौथीमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याचा प्रकार मागील चार दिवसांपासून सुरू होता. संबंधित विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितला. आज पीडित मुलींच्या पालकांनी हा प्रकार पोलिस ठाण्यात येऊन सांगितला. पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत त्या शाळेतील शिक्षकाला ताब्यात घेतले.
पोलिसात याप्रकरणी भरत कांबळे याच्यावर विनयभंग व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील अधिक तपास करीत आहेत.
आटपाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयित मुलासह मुलगीवर गुन्हा; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत उचलून नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरात घडला आहे. या प्रकरणी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे या दोघांवर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना गेल्या महिन्यात घडली. या घटनेतील पीडिता सतरा वर्षांची आहे. संग्राम देशमुख (आटपाडी) आणि त्याची साथीदार युवती सुमित्रा लेंगरे ( लेंगरेवाडी) यांनी संगनमत करून पीडित मुलीला स्वतःच्या लाल रंगाच्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून निर्जन ठिकाणी आटपाडी तलावावर नेले. तेथे संशयित देशमुख याने गाडीतच मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अश्लील चित्रण केले. ही घटना कोणाला सांगितल्यास घरच्यांना आणि बहिणीला मारण्याची धमकी दिली.
तसेच दुसऱ्या दिवशी त्याचवेळी या ठिकाणी येण्याची धमकी दिली. संबंधित ठिकाणी न आल्यास फोटो इतरांना दाखवण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी पीडितेस पुन्हा ११ ऑगस्टला बोलावून दुपारी दोन वाजता नेऊन पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून संशयितांनी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
देशिंग शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक निलंबित; मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांचे आदेश
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील जगताप वस्ती- देशिंग येथील उपशिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक भरत विश्वनाथ कांबळे एका प्रकरणात दोषी आढळल्याचा अहवाल कवठेमहांकाळ गटशिक्षणाधिकारी यांनी दिला. त्यावरून कांबळे यांना तत्काळ जिल्हा सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी सोमवारी काढले.
निलंबनाच्या काळात कांबळे यांना मुख्यालय शिराळा पंचायत समिती, शिक्षण विभाग येथे पाठवण्यात आले आहे. जगताप वस्ती देशिंग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक भरत विश्वनाथ कांबळे यांच्या विरोधात पालकांनी तक्रार केली होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडून आज जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला. यामध्ये कांबळे यांच्याविरोधातील तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून अशोभनीय वर्तणुकीच्या कारणावरून कांबळे यांना या तत्काळ सांगली जिल्हा सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री. कांबळे यांनी शासकीय नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदार वर्तन केले आहे. शिक्षकी पेशास काळिमा फासणारे अशोभनीय वर्तन करून जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
त्यामुळे त्यांना या आदेशाच्या दिनांकापासून जिल्हा सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. निलंबनाच्या काळात भरत कांबळे यांना मुख्यालय सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समिती, शिक्षण विभाग येथे पाठवण्यात आले आहे.