सांगली

सांगलीजवळील हरिपूर येथील खून प्रकरणाचा छडा

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याने खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक करून अनुकरणीय कामगिरी केली आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता सांगलीतील हरीपूर रोडवर घडली. आरोपींनी एका वादातून २१ वर्षीय सुरज आलीसाब सिध्दनाथ याचा निर्घृण खून केला होता.

सांगली

गुन्ह्याचा तपशील

फिर्यादी अलीसाब लालासाब सिध्दनाथ (वय ६०, रा. पवार प्लॉट, सांगली) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत सुरज सिध्दनाथ याच्या मोटारसायकलने आरोपींच्या गाडीला कट दिल्याने झालेल्या वादातून हा खून घडला. आरोपींनी कोयता आणि चाकू यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून मृताच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, पाठीवर आणि छातीवर वार केले.

हे देखील वाचा: sangli murder news: सांगलीजवळ हरिपूरमध्ये निर्घृण खून: 24 वार झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, गाडी आडवी मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून हत्याकांड

संशयित आरोपींची माहिती

गुन्ह्यात तीन प्रौढ आरोपी आणि चार अल्पवयीन बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रौढ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1. अरमान जावेद शेख (वय १९, रा. पत्रकार नगर, सांगली)
2. अथर्व नरेंद्र गायकवाड (वय १८, रा. गांवभाग, सांगली)
3. सौरभ अशोक यादव (वय २१, रा. गजानन कॉलनी, सांगली)

जलद तपास आणि अटक

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात केली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरोपी हरीपूर कोथळी पूल स्मशानभूमीजवळ असल्याचे समजले. संयुक्त पथकाने ४ डिसेंबरच्या रात्री ११:४५ वाजता आरोपींना अटक केली.

सांगली

आरोपींचा कट उघड

चौकशीतून उघड झाले की, एका अल्पवयीन आरोपीचा स्वप्नील खांडेकर (रा. पाटणे प्लॉट) याच्याशी पूर्वी वाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर तो चिडून होता. स्वप्नील पुण्यात शिक्षण घेत होता आणि तो सांगलीत परत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने आरोपींनी योजना आखली.

हे देखील वाचा: Kolhapur crime news: कर्जबाजारी डॉक्टर बनला घरफोड्या: चार जणांच्या टोळीला अटक; 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

त्यामुळे बालकाने यातील आरोपी क्रं. १ ते ३ व इतर तीन बालकांशी आपसांत संगणमत करुन स्वप्नील खांडेकर याला मारण्यासाठी सोबत हत्यारे घेवून गुळवणी महाराज मठाजवळून हरीपूर रोडने जात असताना दि.०४.१२.२०२४ रोजी हरीपूर रोडवरील गुळवणी महराज मठाजवळून यातील मयत सुरज आलीसाब सिध्दनाथ हा हीरो होंडा स्पलेंडर मोटर सायकल नंबर MH10 AM-2232 यावरुन जात असताना त्याने वर नमूद आरोपी व बालक यांचे मोटर सायकलला कट मारुन गेल्याचे कारणावरुन त्यांचेत वाद झाला.

आरोपी व बालक यांनी त्यांचेजवळील कोयता व चाकूने मयताचे डोकीत, मानेवर, गळयावर, पाठीवर, छातीवर, पोटावर व खांदयावर हत्याराने मारुन वार करुन त्याचा निर्घृण खून केला असल्याची कबुली दिली आहे. मात्र, वाद होता स्वप्नील खांडेकरशी, पण जीव गमवावा लागला सुरज सिध्दनाथला.

पोलीस कारवाईचे नेतृत्व करणारे अधिकारी

या कामगिरीत सतीश शिंदे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) आणि किरण चौगले (पोलीस निरीक्षक,  ग्रामीण पोलीस ठाणे) यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या जलद कारवाईसाठी  पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

हे देखील वाचा: Highly venomous snake:Takshak Naga/ तक्षक नाग: पौराणिक सर्पराजाचा गूढ प्रवास आणि सांस्कृतिक महत्त्व; 6 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !