सारांश: सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने सांगली मारुती रोडवरील ऊँ बेल्ट्स अँड नॉव्हेल्टी दुकानात कारवाई करून ८ ई-सिगारेट जप्त केल्या. दुकानमालक लखन मंगलानी याने ऑनलाईन ऑर्डरद्वारे ई-सिगारेट मागवून त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले. ई-सिगारेटवर भारतात बंदी असताना त्याची विक्री केल्याने आरोपीवर “प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अॅक्ट २०१९” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत.
सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
शासनाने निर्बंधित केलेल्या ई-सिगरेट विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करत १६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी लखन चंद्रकांत मंगलानी (वय ३५, रा. लोंढे कॉलनी, मिरज) याच्याविरुद्ध प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट अॅक्ट २०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील
१२ फेब्रुवारी रोजी रात्री ७.४० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास माहिती मिळाली की, सांगलीच्या मारुती रोडवरील ‘ऊँ बेल्टस् अँड नॉव्हेल्टी’ या दुकानात बेकायदेशीर ई-सिगरेट विक्री सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुकानाची झडती घेतली असता, Yuoto EXPLORER १६००० PUFFS प्रकारच्या ५० मि. ग्रॅम निकोटिन असलेल्या ०८ ई-सिगरेट जप्त करण्यात आल्या.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
सदर आरोपीने हा मुद्देमाल ऑनलाइन ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पद्धतीने मागविल्याचे कबूल केले. प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट अॅक्ट २०१९ नुसार ई-सिगरेटचे उत्पादन, आयात, निर्यात, विक्री व जाहिरात बंदी असतानाही तो त्याची साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सांगली शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष पथकाकडून सतर्कतेची कारवाई
सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ व बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
यापुढेही सांगली व मिरजमधील पानटपऱ्या आणि अन्य संशयित ठिकाणी तपासणी करून बेकायदेशीर ई-सिगरेट विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ई-सिगारेट म्हणजे काय?
ई-सिगारेट (Electronic Cigarette) म्हणजे एक बॅटरीवर चालणारे उपकरण आहे, जे द्रव निकोटीन गरम करून त्याचा वाफ स्वरूपात धूर निर्माण करते. पारंपरिक सिगारेटपेक्षा वेगळी असली तरी ती निकोटीनयुक्त असल्याने व्यसनाधीनता निर्माण करू शकते. याला “व्हेपिंग डिव्हाइस” असेही म्हणतात.भारत सरकारने 2019 साली “प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अॅक्ट” (Prohibition of Electronic Cigarettes Act, 2019) लागू करून देशभरात ई-सिगारेट उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण, आयात आणि जाहिरातीवर संपूर्ण बंदी घातली आहे.