सांगली -विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई
सांगली, (आयर्विन टाइम्स):
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथकाने ४ नोव्हेंबर रोजी धुळे येथील एका संशयित गुन्हेगारास अटक करून अवैध शस्त्रसाठा जप्त केला.
गुन्ह्याची हकिकत
सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन माने आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. गोकुळनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला २०-२५ वर्षांच्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे दोन देशी बनावटीच्या पिस्टल्स, एक गावटी कट्टा, दोन मॅग्झीन आणि आठ जिवंत काडतुसे मिळाली. आरोपी यासिन उर्फ सोनु शगीर मेहत्तर (वय २३, रा. गल्ली नं.५, भंगार बाजार, धुळे) याने त्याच्या जवळील शस्त्रांसाठी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले.
जप्त शस्त्रसामग्री
1. लोखंडी बनावटीची दोन पिस्टल्स मॅग्झीनसह – किंमत: ₹१,००,०००
2. गावटी बनावटीचा कट्टा* – किंमत: ₹२०,०००
3. दोन मॅग्झीन – किंमत: ₹५,०००
4. आठ जिवंत काडतुसे – किंमत: ₹४,०००
5. काळ्या रंगाची सॅक – किंमत: ₹३००
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत – ₹१,२९,३००.
पुढील तपास
सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि चेतन माने करीत आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी जनतेला अवैध शस्त्रविक्रीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.