आंबा घाटात आढळलेले तरुण १४ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद कागल पोलिस ठाण्यात
आयर्विन टाइम्स / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा (ता. शाहूवाडी) येथील सुमारे अडीचशे ते तीनशे फुट खोल दरीत दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांची नावे सौरभ दिनकर माने (वय २५, रा. कवठेपिरान, ता. मिरज) आणि प्रशांत श्रीरंग सातवेकर (वय १९, रा. निपाणी) अशी ओळखण्यात आली आहेत.
शनिवारी (ता. १७) आंबा घाटात पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, परंतु जोरदार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मोहीम थांबवावी लागली. ही मोहीम आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

आंबा घाट घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना आंबा जंगलातील सडा येथे मोटारसायकल (एमएच १० डी. जे. २०२३) उभी आढळली. दुचाकी शेजारी कोणीही नसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. शाहूवाडी आणि साखरपा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंबा घाटात शोधमोहीम राबवली, त्यावेळी लगतच्या खोल दरीत दोन तरुणांचे मृतदेह सापडले.
आंबा घाटात पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी मोहीम उभारली होती, पण दरीची खोली आणि प्रतिकूल हवामानामुळे अडचणी आल्या. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून सांगली पोलिसांशी संपर्क साधून दुचाकी मिरज तालुक्यातील असल्याचे ओळखले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, दोन्ही तरुण एका आश्रमातील होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेचा संदर्भ कागल तालुक्यातील गोरंबे मठाशी जोडला जात आहे. मठातील गुरुचे निधन झाल्यानंतर हे दोघे तरुण साधनेसाठी बाहेर पडले होते, अशी माहिती मिळाली आहे. हे तरुण रायगडकडे जाणार होते, परंतु ते आंबा घाटात कसे आले याचा उलघडा झाला नाही. १४ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या संदर्भात पोलिस तपास करत असून, यामुळे घटनेबाबत आणखी स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
साताऱ्याचा दुचाकी चोरटा जाळ्यात: विटा पोलिसांकडून सव्वातीन लाखांच्या दुचाकी हस्तगत
आयर्विन टाइम्स / विटा
विटा, सातारा, हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला गजाआड करण्यात सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांना यश आले. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय २१, शाहूपुरी, सातारा) असे संशयितांचे नाव आहे. त्यास अटक करून सव्वा तीन लाख रुपये किमतीच्या विविध नऊ दुचाकी हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.
विवेकानंदनगर (विटा) येथील इमारतीच्या वाहनतळामधून ९ व १० जून रोजी दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद चंद्रकांत नरसय्या गजेली (विटा) यांनी विटा पोलिसांत दिली होती. अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपास करताना पोलिस हेमंत तांबेवाघ यांना गोपनीयरीत्या चोरी सातारा येथील अभिषेक हावळेकर याने केली असून तो विटा ग्रामीण रुग्णालयात येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून हावळेकरला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. विटा पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीचा गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातील नऊ दुचाकी जप्त केल्याचे मेमाणे यांनी सांगितले. पोलिस संभाजी महाडिक, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, प्रमोद साखरपे, संभाजी सोनवणे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, करण परदेशी, विवेक साळुंखे, अजय पाटील, हेमंत तांबेवाघ, महेश संकपाळ यांनी कारवाई केली.
गोवा बनावटीचे मद्य तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: सांगलीत ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई
आयर्विन टाइम्स /सांगली
गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करून त्याचे टोपण व सील बदलून सांगलीत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. ८ लाख ८३ हजार ४३० रुपयांच्या मद्यासह साहित्य व एक चारचाकी असा १० लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल केला असून तिघांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
अब्दुलरझाक नजरूद्दीन मुलाणी (वय २६, कवठेमहांकाळ), महंमदकैफ बशीर बागवान (वय २०, थबडेवाडी) आणि सिद्दीक मुबारक नदाफ (वय १८, कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोटे यांनी दिलेली माहिती अशी, की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एक पथक शहरात अवैधरीत्या येणाऱ्या मद्यावर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. पथकाला शहरातील विजयनगर येथे असणाऱ्या इमारतीजवळ काहीजण चारचाकीतून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने सापळा रचून संशयास्पदरीत्या फिरणारी चारचाकी (एमएच १३, सीएस ०७९५) आढळून आली. तपासणी केली असता गाडीच्या डिकीत विदेशी गोवा बनावटीचे विदेशी दारू मिळून आली.
संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता बेकायदा मद्यसाठा वानलेसवाडी येथील विजयनगर येथील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून भरल्याची माहिती संशयित तिघांनी दिली. पथकांनी छापा टाकला असता तेथे विदेशी दारूच्या बाटल्यांत बनावट टोपण लावून आजूबाजूच्या हॉटेलधारकांना विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. गोवा बनावटीची बेकायदा दारू, बाटल्या, टोपण आणि मोटार असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सात जणांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक केली.