अपघात झालेले कुटुंब सांगलीचे
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
कोल्हापूर-सांगली मार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीवरील जुन्या अंकली पुलावरून मोटार सुमारे दीडशे फूट खाली कोसळून दांपत्यासह तिघे ठार झाले. तिघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात बुधवारी (ता. २८) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. सर्व मृत सांगलीतील आहेत. कोल्हापुरतील एका समारंभाहून सर्वजण रात्री उशिरा सांगलीला घरी परतत असताना हा अपघात झाला. त्यात प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), त्यांची पत्नी प्रेरणा (३६, रा. मारुती रोड गावभाग, सांगली), वैष्णवी संतोष नार्वेकर (२१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. समरजित प्रसाद खेडेकर (७), वरद संतोष नार्वेकर (१९), साक्षी संतोष नार्वेकर (४२) गंभीर जखमी झालेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोल्हापूर येथील हॉटेलात होते लग्नाचे रिसेप्शन
प्रसाद यांच्या नातेवाइकांकडील विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ बुधवारी रात्री कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये होता. त्यासाठी खेडेकर कुटुंबीय गेले होते. समारंभ आटोपून ते सर्वजण रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतत येण्यासाठी निघाले. प्रसाद मोटार चालवत होते. त्यांच्याबरोबर मोटारीत पत्नी प्रेरणा, वैष्णवी नार्वेकर, वरद नार्वेकर, साक्षी नार्वेकर व समरजित खेडेकर होते.
मागून येणाऱ्या मोटारसायकस्वारामुळे आणखी अनर्थ टळला
उदगाव येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाजवळ आल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास अपघात झाला. सांगलीकडे जाणाऱ्या या मोटारीमागे असलेल्या एका युवकाने मोटार पुलावरून खाली पडल्याची माहिती उदगाव दूरक्षेत्र पोलिस चौकीतील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलिस, उदगाव व जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. उदगाव
टोल नाक्यावर रात्रभर चहाच्या टपऱ्या सुरू असतात. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे प्रवासी चहासाठी थांबले होते. याचवेळी अपघात झाल्यामुळे व्यावसायिकांबरोबरच प्रवाशांनीदेखील मदत कार्यात सहभाग घेतला.
अनेकांनी मोबाईलचा टॉर्च दाखवून सहकार्य केले. पोलिस व कार्यकर्त्यांनी गाडीचे दरवाजे उघडून व मागील काचेतून सर्वांना बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी प्रसाद, प्रेरणा, वैष्णवी नार्वेकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर इतर जखमींवर सांगली येथील दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद जखमी वरद संतोष नार्वेकर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. दुर्घटनास्थळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी होती. अपर पोलिस अधीक्षक नीलेश खाटमोडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अपघातग्रस्त ठिकाणी चार पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला होता.
जुन्या पुलावरून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटार खाली कोसळली. ही घटना पाठीमागील मोटारसायकलस्वाराच्या लक्षात आली. त्याने तातडीने पाठीमागेच असलेल्या पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. जयसिंगपूरचे निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्याबरोबरच जखमींना रुग्णालयात हलविले.
सांगलीतील खेडेकर कुटुंबीय सुवर्ण कारागीर
नातेवाईक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सांगलीतील गावभागात राहणारे खेडेकर कुटुंब राहते. भालचंद्र खेडेकर यांना दोन मुली आणि एकुलता एक मुलगा प्रसाद. त्यांचा काही वर्षांपूर्वी प्रेरणा यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना सात वर्षांचा मुलगा आहे. प्रसाद हे सुवर्ण कारागीर आहेत. मामेबहिणीच्या लग्नानिमित्त रिसेप्शन कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले होते. जाताना त्यांनी दोन चारचाकी केल्या होत्या. एका वाहनात प्रसाद, पत्नी प्रेरणा, त्यांचा मुलगा, प्रसाद यांची बहीण, भाचा आणि भाची वैष्णवी संतोष नार्वेकर असे सहा जण होते; तर दुसऱ्या वाहनात इतर नातेवाईक आणि प्रसाद यांच्या बहिणीचे पती बसले होते. रात्री दोन्ही वाहने एकाचवेळी निघाली.
प्रसाद यांचे भावोजी असलेली चारचाकी लवकर पुढे गेली. या गाडीत असलेले संतोष हे आकाशवाणीनजीक राहतात. ते घरी जाऊन आवरून झोपण्याची तयारी करीत होते, मात्र अजून प्रसाद यांचा काहीच फोन न आल्याने तसेच पत्नी आणि मुलेदेखील घरी न आल्याने त्यांनी प्रसाद यांना फोन केला, परंतु तो उचलला गेला नाही. त्यामुळे बहुधा त्यांच्या चारचाकीचे चाक पंक्चर झाले असावे, असे वाटल्याने ते मदतीसाठी कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. अंकली पुलानजीक ते आले असता तेथे त्यांना थोडी गर्दी दिसली. त्यावेळी अपघाताचे चित्र समोर आले अन् धक्का बसला.
समरजित झाला पोरका
अपघातात आई-वडील जागीच ठार झाले. यात त्यांचा सात वर्षांचा मुलगा समरजित बचावला. आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे समरजित पोरका झाला आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
जुन्या अंकली पुलावरील कठडे मोडलेले असून, त्याठिकाणी झाडी वाढल्यामुळे वाहनचालकांना वळण दिसत नाही. या भागात यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. मात्र, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आणखी अनर्थ टळला
मोटार दीडशे फूट खाली कोसळल्यानंतर ती एका मोठ्या दगडाला अडकल्याने थांबली. अन्यथा ती नदीत गेली असती, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती.
जबाबदारीचे भान हवे
वारंवार अपघात होत असूनही कठड्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही न केल्यास आणखी दुर्घटनांचे बळी द्यावे लागतील, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.