अपहरण

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पोळेकर यांचे झाले होते अपहरण

पुणे,(आयर्विन टाइम्स):
सिंहगडाच्या पायथ्याजवळून अपहरण झालेल्या एका शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली असून, आणखी दोघांना मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ७० वर्षीय विठ्ठल सखाराम पोळेकर (रा. पोळेकरवाडी, सिंहगड पायथा) असे मृत ठेकेदाराचे नाव असून, ओसाडे (ता. वेल्हे) गावाच्या हद्दीत त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

अपहरण

या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी पोळेकर यांच्या कुटुंबीयांकडे दोन कोटी रुपयांसह एका आलिशान चारचाकी वाहनाची मागणी खंडणी स्वरूपात केली होती. सप्टेंबर महिन्यात पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग धरून, आरोपींनी हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हे देखील वाचा: Jat crime news : जत, उमदी पोलीस ठाणे हद्दीतून 3 गुन्हेगारांची हद्दपारी; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई

कुटुंबियांची खंडणीची मागणी अस्वीकृत; गंभीर परिणाम

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर आणि त्यांच्या मुलाने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रस्त्याच्या कामाशी संबंधित मुद्द्यावरून आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे याने महागड्या चारचाकी वाहनाची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे, भामे याने प्रशांत पोळेकर यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही मागणीही अस्वीकृत झाल्यावर भामे आणि त्याच्या साथीदारांनी विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केले.

पोळेकरांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला

गुरुवारी पहाटे ५:३० च्या सुमारास नियमित मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पोळेकर यांच्या घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. काही दिवसांपूर्वीच त्यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या अपहरणाची शक्यता लक्षात घेऊन घरच्यांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी योगेश भामे विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, अशा घटनांमुळं पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा: Kolhapur accident news : सहलीला गेलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाचा घाला; राजस्थानमध्ये हुपरीच्या चव्हाण कुटुंबाचा भीषण अपघात; दोघे जखमी

शनिवारी सायंकाळी विठ्ठल पोळेकर यांच्या शरीराचे काही भाग खडकवासला धरणात, तर उर्वरित मृतदेह ओसाडे गावच्या हद्दीत छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. या भीषण घटनेचा तपास पुणे ग्रामीण पोलिस करत असून, आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *