बेंगळुरू (आयर्विन टाइम्स वृत्तसंस्था) :
कर्नाटक पोलिस दलातील एक धडाडीचे अधिकारी, माजी पोलिस महासंचालक (DGP) ओम प्रकाश यांचा मृत्यू रविवारी (20 एप्रिल) संशयास्पद परिस्थितीत झाला असून, त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बेंगळुरूतील त्यांच्या निवासस्थानी, तीन मजली इमारतीच्या भूतलावर, रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी हत्या झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होत असून, पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.
पत्नीने दिली पोलिसांना माहिती
ही घटना समोर येताच ओम प्रकाश यांच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तातडीने पंचनामा व तपास सुरू करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची स्थिती पाहता ही नैसर्गिक मृत्यूची बाब नसून, त्यामागे हिंसक घटक असू शकतो, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मृतदेहावर जखमांचे स्पष्ट निशाण
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने केलेल्या जखमांचे निशाण दिसून आले आहेत. त्यामुळे हत्या झाल्याची शक्यता बळावली आहे. तसेच, घरात संघर्षाचेही काही पुरावे मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
पत्नी व मुलीची चौकशी सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या पत्नी व मुलीकडून चौकशी सुरू केली आहे. प्राप्त माहितीनुसार, ओम प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या काही जवळच्या व्यक्तींमुळे जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीयांमधील एखाद्या व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
FIR नोंदवून पुढील तपास
बेंगळुरूचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विकास कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “रविवार दुपारी ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास ही माहिती मिळाली. त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारे लवकरच FIR नोंदवण्यात येईल आणि त्यानंतर सखोल तपास सुरू केला जाईल.”
आतापर्यंत कोणतीही अटक नाही
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे, मोबाईल रेकॉर्डस् यांचीही तपासणी सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्राथमिक तपासात हा घरगुती वाद किंवा संपत्तीविषयक मतभेदातून घडलेला गुन्हा असू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ओम प्रकाश : एक तेजस्वी व शिस्तबद्ध अधिकारी
Om Prakash हे 1981 बॅचचे कर्नाटक केडरमधील IPS अधिकारी होते. मूळचे बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असलेले ओम प्रकाश यांनी भूविज्ञानात M.Sc. केली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी राज्य लोकायुक्त, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, CID (गुन्हे अन्वेषण विभाग) यांसारख्या महत्वाच्या खात्यांमध्ये नेतृत्व केलं.
1 मार्च 2015 रोजी त्यांची कर्नाटकचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती झाली होती. 2017 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही अनेक सुरक्षा विषयांवर ते मार्गदर्शन करत होते.
या प्रकरणातील अनेक अनुत्तरित प्रश्न अद्याप शिल्लक असून, हत्या की आत्महत्या? – याचा उलगडा होणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांचा तपास कशा दिशेने जातो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. सध्या, कर्नाटकातील पोलीस व प्रशासकीय यंत्रणा या धक्कादायक घटनेमुळे हादरून गेली आहे.