Operation Tara

Operation Tara: ताडोबातून चांदोलीत वाघांचे पुनर्वसन सुरू. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत वाघिणींचे आगमन, रेडिओ कॉलरद्वारे निरीक्षण, पर्यटन विकासाच्या संधी आणि स्थानिक सुरक्षिततेचा आढावा.

सांगली जिल्ह्यातील चांदोली (Chandoli) आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसर आता केवळ जंगल आणि निसर्गप्रेमींसाठीच नव्हे, तर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ताडोबासारखे यशस्वी वन्यजीव पर्यटन चांदोलीतही विकसित होऊ शकते, असा विश्वास वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य शासन, वन विभाग, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि वन्यजीव तज्ज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा विकास शक्य असल्याचे मत पुढे येत आहे.

‘ऑपरेशन तारा’ला हिरवा कंदील

केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला मान्यता दिल्यानंतर ‘ऑपरेशन तारा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला गती मिळाली आहे. या उपक्रमांतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एकूण आठ वाघ टप्प्याटप्प्याने चांदोलीत आणले जाणार असून, त्यापैकी दोन वाघिणी आधीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाल्या आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच तीन नर वाघ होते. ‘१, २, ३’ या ओळखीच्या क्रमांकांऐवजी आता ग्रामस्थ आणि वन विभागाने त्यांना सेनापती, बाजी आणि सुभेदार अशी नावे दिली आहेत. नव्याने आलेल्या दोन वाघिणींमुळे चांदोलीत सध्या पाच वाघांचा वावर झाला आहे. पुढील टप्प्यात आणखी सहा वाघ दाखल झाल्यास चांदोलीतील वाघांची संख्या तब्बल अकरावर पोहोचणार आहे.

Operation Tara

पर्यटन संधींबरोबरच भीतीचे सावट

एकीकडे वाघांच्या आगमनामुळे पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी दुसरीकडे वाढती बिबट्यांची संख्या आणि मानव–वन्यजीव संघर्षामुळे परिसरात आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यात वाघांच्या उपस्थितीमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे वन विभागाने या संपूर्ण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहून ठोस सुरक्षात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेची स्पष्ट हमी दिली गेली, तरच ‘ऑपरेशन तारा’ खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल.

हेदेखील वाचा: Shirala leopard hotspot: शिराळा तालुका बनतोय बिबट्यांचा हॉट स्पॉट | घरांच्या अंगणात बिबट्यांचा वावर, ग्रामस्थ भयभीत

अनुकूलन पिंजरा म्हणजे काय?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (Sahyadri Tiger Reserve region) सोनार्ली गावाजवळ सुमारे दीड हेक्टर क्षेत्रात मानवनिर्मित अनुकूलन पिंजरा उभारण्यात आला आहे. ताडोबातून सह्याद्रीत दाखल झालेली पहिली ‘चंदा’ वाघीण दोन दिवस या पिंजऱ्यात राहिल्यानंतर कोअर झोनमध्ये मुक्त करण्यात आली. सध्या तिचा वावर बफर झोनमध्ये सुरू आहे.

वन विभागाच्या माहितीनुसार, ही ताडोबातील ‘बोल्ड’ वाघीण असून तिला मानवी सहवासाची सवय आहे. सध्या ती नवीन परिसराची टेहळणी करत असून, दहा ते पंधरा दिवसांतच तिने आपली उपस्थिती परिसरात ठळकपणे दाखवायला सुरुवात केली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

रेडिओ कॉलरमुळे २४ तास नजर

ताडोबातून आणलेल्या दोन्ही वाघिणींच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात आले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे वाघांच्या हालचालींचा अचूक मागोवा घेणे शक्य झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पथक २४ तास या वाघांचे निरीक्षण करत आहे.

सोनार्ली येथील अनुकूलन पिंजऱ्याजवळ तसेच कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात डिजिटल प्रणालीद्वारे या वाघांचे सतत मॉनिटरिंग केले जाते. ऑपरेशन तारासाठी खास तयार करण्यात आलेल्या या पिंजऱ्यात गवताळ प्रदेश, पाण्याची सोय, तसेच खाद्यासाठी नैसर्गिक प्राणी सोडण्यात आले आहेत. सुमारे २० फूट उंच कुंपण आणि काटेरी तारेमुळे सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे.

Operation Tara

वाघांच्या वंशवृद्धीला चालना

सध्या एक वाघीण अनुकूलन अवस्थेत असताना, यापूर्वी आलेली चंदा वाघीण कोअर आणि बफर झोनमध्ये मुक्तसंचार करत आहे. तिच्यापासून पाच आणि नऊ किलोमीटर अंतरावर दोन नर वाघांचा वावर आहे. वाघिणीचा वास आल्याने नर वाघ तिच्या दिशेने आकर्षित होण्याची, किंवा चंदा वाघीण नर वाघाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.

हे वाघ एकमेकांच्या संपर्कात आल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या वंशवृद्धीला मोठा हातभार लागणार आहे. यामुळे चांदोली आणि सह्याद्री परिसर दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘ऑपरेशन तारा’ हा केवळ वाघांचे स्थलांतर करणारा उपक्रम नसून, तो संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांना चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, यशासाठी वन विभागाने सुरक्षितता, जनजागृती आणि स्थानिक सहभाग यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. हे साध्य झाले, तर चांदोलीही भविष्यात ताडोबासारखेच एक प्रमुख वन्यजीव पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल.

Tiger Population in Chandoli to Increase Under ‘Operation Tara’

Sangli:
There is strong potential for wildlife tourism similar to Tadoba to be developed in the Chandoli and Sahyadri Tiger Reserve region, as tiger rehabilitation has begun under ‘Operation Tara’ with the relocation of tigers from Tadoba to Chandoli. Following approval from the Central Tiger Conservation Committee, two tigresses have been relocated so far, taking the total number of tigers in the region to five.

The three male tigers already present in the Sahyadri Tiger Reserve have been named Senapati, Baji, and Subhedar. In the next phase, six more tigers will be relocated, increasing the total tiger population in Chandoli to eleven.

Meanwhile, amid rising human–wildlife conflict, the arrival of tigers has added to public concern. There is a growing demand for the Forest Department to implement strong safety measures and assure security to local villagers. The relocated tigresses are being monitored round the clock using radio collars, and their safe rehabilitation is being carried out through specially designed acclimatization enclosures.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *