Nagpur-Goa Shaktipeeth: नागपूर–गोवा शक्तिपीठ प्रस्तावित महामार्गाचे संरेखन बदलले असून नवा मार्ग सोलापूर, सांगली व पंढरपूरमार्गे चंदगडकडे जाणार आहे. पुढील वर्षी कामास सुरुवात होणार. The alignment of the proposed Nagpur-Goa Shaktipeeth Expressway has been changed, and the new route will pass through Solapur, Sangli, and Pandharpur towards Chandgad. Work is scheduled to begin next year.
नागपूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
नागपूर–गोवा या प्रस्तावित द्रुतगती ‘शक्तिपीठ’ (Shaktipeeth) महामार्गाला काही भागांतून विरोध होत असतानाच, राज्य सरकारने या महामार्गाच्या संरेखनात (अलाईनमेंट) महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार हा महामार्ग सोलापूर व सांगली जिल्ह्यांतून जात पंढरपूरजवळून पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडकडे जाणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षी सुरू होणार असून, त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘शक्तिपीठ’ (Shaktipeeth) महामार्गाचे महत्त्व आणि नव्या संरेखनामागील भूमिका स्पष्ट केली. नागपूर–गोवा हा मार्ग अनेक जिल्ह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाण-घेवाण आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, या भूमिकेतून संरेखनात बदल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता ही वेगळी नवीन अलाईनमेंट सोलापुरातून सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरच्या चंदगडकडे जाईल. ‘शक्तिपीठ’च्या पहिल्या संरेखनातून आमचे जयंतराव (पाटील) पहिल्यांदा सुटून गेले होते; पण ‘शक्तिपीठ’ आता त्यांच्या मतदारसंघाजवळून जात आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग लवकर करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘शक्तिपीठ’ महामार्गाचे नाव जरी नागपूर–गोवा असे असले, तरी त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे. हा एकच महामार्ग मराठवाड्याचे चित्र बदलून टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील संरेखनात सोलापूरपासून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याबाबत नागरिकांचे आक्षेप होते. हे आक्षेप योग्य असल्याने त्यावर सकारात्मक विचार करून सोलापूरपासून स्वतंत्र व नवीन अलाईनमेंट तयार करण्यात आली आहे.
या नव्या अलाईनमेंटनुसार महामार्ग सोलापुरातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडकडे जाईल. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींसह सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘शक्तिपीठ’ च्या पहिल्या संरेखनातून काही मतदारसंघ वगळले गेले होते; मात्र नव्या मार्गामुळे संबंधित भागांना थेट लाभ मिळणार आहे. या महामार्गामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘गती–शक्ती’ योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर वनजमीन वगळण्यात यश आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा हा प्रवास १८ तासांवरून थेट ८ तासांपर्यंत कमी होईल. परिणामी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने भक्कम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
ज्या भागातून आधी संरेखन काढण्यात आले होते, तेथील नागरिकही आता रचना बदलू नये, अशी मागणी करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. चंदगड परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘शक्तिपीठ’ महामार्ग हवा असल्याची मागणी केल्याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली.
एकूणच, ‘शक्तिपीठ’ महामार्ग हा केवळ दळणवळणाचा प्रकल्प नसून धार्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि राज्यातील संपर्क सुविधा बळकट करणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले. नव्या संरेखनामुळे सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना थेट लाभ मिळणार असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात हा महामार्ग मैलाचा दगड ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


