सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सांगली शहरातील आयर्विन पुलावर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला, तर मिरजेत पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तलवारीने वार करून त्याचा जीव घेतला. जिल्ह्यात घडलेल्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आयर्विन पुलावर पत्नीचा निर्घृण खून
रविवारी रात्री सांगली शहरातील आयर्विन पुलावर जकाप्पा सोमनाथ चव्हाण (रा. बबलेश्वर, जि. विजापूर) याने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला. प्रियांका जकाप्पा चव्हाण (वय २८, रा. सांगलीवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेचा तपशील:
प्रियांका आणि जकाप्पा यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. जकाप्पा हा रत्नागिरीतील दगड खाणीत काम करत होता. मात्र, दारूच्या व्यसनामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर प्रियांका आपल्या आई आणि भावासोबत सांगलीवाडीत राहायला आली. ती टिळक चौकातील एका साडी सेंटरमध्ये नोकरी करत होती.
शनिवारी रात्री जकाप्पा तिला भेटण्यासाठी आला. त्याने तिला भेटून समेट घडवण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी त्याने तिला सरकारी घाटावर बोलावले. दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या जकाप्पाने चाकूने तिच्या गळ्यावर वार केला. तिथेच रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने प्रियांकाच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर अखेर आयर्विन पुलाखाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी विमला एम. आणि पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
मिरजेत तलवारीने गुन्हेगाराचा खून
मिरज शहरातील कमानवेस परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार कुणाल दिनकर वाली याचा तलवारीने वार करून खून करण्यात आला. तो नुकताच ‘मोक्का’खालील गुन्ह्यातून जामिनावर सुटला होता.
घटनेचा तपशील:
रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाली हा कमानवेस चौकात आला असताना त्याच्या विरोधातील टोळीने त्याच्यावर हल्ला केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांनी त्याच्याशी काही मिनिटे वाद घातल्यानंतर अचानक तलवारीने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच मृत्यू पावला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपाधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक तपासात संशयितांची नावे समोर आली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात वाढता गुन्हेगारीचा आलेख – पोलिसांसमोर आव्हान
सांगलीत अवघ्या काही दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी दौऱ्यावर असताना अशा घटना घडल्याने यंत्रणेची धडकी भरली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात कठोर कारवाईचे आदेश दिले असून, दोन्ही हत्यांसंबंधी तपास सुरू आहे.
सांगली आणि मिरजमध्ये घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस विभागाकडून तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.