ही घटना जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे १२ ऑगस्ट रोजी घडली
आयर्विन टाइम्स / जत
कर्नाटकातील मदभावी ( ता. अथणी जि. बेळगाव) येथील तरुण निवृत्ती ऊर्फ आप्पासाब सिदराया कांबळे (वय ३९) याचा लोखंडी रॉड, काठी आणि पाईपने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे १२ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर हल्लेखोरांनी मृतदेह कर्नाटकातील अथणी-अनंतपूर रोडवरील एकुंडी क्रॉस बसस्टँड येथे टाकून दिला.
या प्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार, प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा संशय आहे. या घटनेत निवृत्तीचा मित्र गणेश शाम वाघमोरे (वय १९, रा. जंबगी ,कर्नाटक ) जखमी झाला आहे. खून आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, जत पोलिस ठाण्यात मृत निवृत्ती कांबळेची पत्नी कविता निवृत्ती ऊर्फ आप्पासाब कांबळे (वय ३५) हिने नव्याने फिर्याद नोंदवली आहे.
आरोपींची नावे आणि अटक
अथणी आणि जत पोलिसांनी मिळून आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये सिद्धाप्पा शिवाप्पा कित्तुरे (वय ४५), महादेव शिवाप्पा कित्तुरे (वय ४९, रा. साळमळगेवाडी ता. जत जि. सांगली), दिनेश वसंत गडदे (वय २७), अमुल रंगराव गडदे (वय १९), महादेव काडाप्पा गुंडेवाडी, राजकुमार प्रकाश दबडे (सर्व रा. चाबुस्करवाडी), प्रदीप राजाराम नरुटे आणि चिन्नू राजाराम नरुटे (राहणार चंद्रपट्टणवाडी, ता. अथणी, बेळगाव) यांचा समावेश आहे. यातील चार आरोपींना अथणी पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेचा तपशील असा
१२ ऑगस्ट रोजी रात्री मृत निवृत्ती कांबळे आणि त्याचा मित्र गणेश वाघमारे हे सिद्धाप्पा कित्तुरे यांच्या घरी आले होते. त्या वेळी सिद्धाप्पा कित्तुरे आणि इतर सात आरोपींनी संगनमत करून निवृत्तीचे पाय दोरीने बांधून, लोखंडी रॉड, लाकडी काठी आणि पाईपने त्याच्या डोक्यात आणि शरीरावर जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह चारचाकीतून कर्नाटकातील अनंतपूर येथील एकुंडी क्रॉस बसस्टँड येथे नेऊन टाकण्यात आला. अथणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि गुन्हा नोंदवला. महिनाभरानंतर हा गुन्हा जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे करत आहेत.