मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री
सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विशेष मोहीम राबवून मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ८९० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपशील:
दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून जुनेद शब्बीर शेख (वय ३१, रा. हंगर गल्ली, बुधवार पेठ, मिरज) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून Nitrosun 10 आणि Nitrosun 5 या ब्रँडच्या एकूण ८९० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
अंमली पदार्थ विक्रीवर कडक कारवाईचा इशारा
सांगली जिल्ह्यात नशा मुक्त भारत अभियानांतर्गत अवैध औषध विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दर आठवड्याला विशेष टास्क फोर्सची बैठक होत असून, जिल्ह्यातील औषध प्रशासन, फार्मासिस्ट असोसिएशन आणि पोलीस विभागाला अशा प्रकारच्या कारवायांसाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.
कशाप्रकारे झाली कारवाई?
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सावंत, जयदीप केळकर आणि त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करत असताना, पोलीस हवालदार अमोल ऐदाळे व अतुल माने यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी जुनेद शेख मिरज मार्केट यार्ड परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
जप्त औषधांबाबत काय सांगितले?
औषध निरीक्षक राजेंद्र करंडे यांच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या Nitrosun 10 आणि Nitrosun 5 या औषधांचा मानवी मेंदूवर गुंगीकारक परिणाम होतो. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या सेवन केल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आरोपीकडे या गोळ्यांची कोणतीही परवानगीपत्रे अथवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नव्हते.
पुढील तपास सुरू
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपी पुढील कारवाईसाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. (miraj crime news)