मिरज तालुक्यातील निलजी येथील गुन्ह्यातील आरोपी खुनाच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला संशयित
आयर्विन टाइम्स / मिरज
मिरज तालुक्यातील निलजी येथे सशस्त्र जबरी चोरीनंतर महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. याप्रकरणी पोलिसांनी एकासजेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बेळंकी रस्त्यावर कारवाई केली. गजपती शिसफुल भोसले ( वय ३० रा. बोलवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, गजपती हा खुनाच्या गुन्ह्यातही पाहिजे असलेला संशयित आहे.
पोलिसांनी सांगितले की, मिरज तालुक्यातील निलजी येथे २७ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पीडिता झोपल्या होत्या. यावेळी संशयीत ४ दरोडेखोरांनी घरात जबरदस्ती घुसून मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले. त्यानंतर त्यातील एकाने पुन्हा घरात येवून महिलेवर अत्याचार केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने मिरजसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सदर घटनेबाबत माहिती घेवून गुन्हा उघडीस आणण्याच्या सुचना दिल्या. या गुन्ह्यात कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन यांच्या पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला आणि सोमनाथ गुंडे यांना तांत्रीक तपास केला.
गुन्ह्यातीलसंशयित गजपती भोसले हा लिंगनूर ते बेळंकी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली. मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा रचून संशयित गजपती भोसले याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता सदर गुन्हा हा त्याने त्याच्या अन्य साथीदारासोबत केला असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या खुनाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे.
निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक भैरू तळेकर, सहायक निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन, रुपाली बोबडे, अनिल ऐनापुरे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे, अमोल एदाळे, आमसिद्ध खोत यांच्या पथकाने कारवाई केली.